महागड्या गाड्या भाड्याने कंपनीत लावतो असे सांगून फसविणार्या टोळीपैकी दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि.24 (संजय कदम) ः महागड्या गाड्या वेगवेगळ्या कंपनीत भाड्याने लावतो असे सांगून लोकांकडून बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून सदर गाड्या परस्पर विकणार्या टोळीपैकी दोघा जणांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. तर यातील तिसरा आरोपी याने आत्महत्या केली असून चौथ्या आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
पनवेल परिसरातील तसेच मुंबई येथील डी.बी.मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील विविध लोकांना तुमच्या नवीन गाड्या आम्ही वेगवेगळ्या नामांकित कंपनीमध्ये भाड्याने लावतो व त्याबद्दल तुम्हाला दरमहा 18 हजार रुपये देवू, असे सांगून रितसर करार करून सुरूवातीचे काही महिने ठरलेले भाडे देवून त्यानंतर भाडे देण्यास टाळाटाळ करून लोकांकडून घेतलेल्या गाड्या परस्पर विकून टाकण्याचा प्रकार या टोळीमार्फत करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मुंबई येथील एका संगणक व्यावसायिकाला 1 करोड 08 लाख 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार सुद्धा या टोळीविरुद्ध दाखल करण्यात आली होती. या संदर्भात परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, सपोनि विजय खेडकर, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, पो.हवा.अमोल कांबळे, अमृत शिंदे, संतोष शिंदे, राकेश मोकल, सागर रसाळ, पो.कॉ.राजकुमार सोनकांबळे, सुनील खैरनार आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या नुसार सदर आरोपींचा शोध घेतला असता यातील आरोपी राजशेखर गौडा (50) याने आपण पकडले जावू या भितीने आत्महत्या केली आहे. तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सुरज पाटील व करण उर्फ जगदीश चौधरी यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन पकडून त्यांच्याकडून जवळपास 41,68,000/- रुपये किंमतीची दहा वाहने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा ऐेवज हस्तगत करण्यात आला आहे. तर एक आरोपी फरार आहे.
कोट
अशा प्रकारच्या आवाहनाला नागरिकांनी फसू नये, आपली गाडी ज्या कंपनीत लावली आहे त्या ठिकाणी ती सलामत आहे का? याची तपासणी वेळोवेळी वाहन मालकांनी करावी व अशा प्रकारे अफरातफर आढळल्यास त्यांनी तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा ः परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील