राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर जिल्हा सचिव प्रसाद ढगेपाटील यांचे प्रश्नचिन्ह
पनवेल/वार्ताहर:खारघर शहर अध्यक्ष पदाच्या वादावरून पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. अत्यंत आक्रमकरीत्या ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय मयेकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात सतीश पाटील यांच्याविरुद्ध रान उठवले असतानाच आता शहर जिल्ह्याच्या मुख्य समितीचे जिल्हासचिव प्रसाद ढगेपाटील यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. सतीश पाटील यांच्या अकार्यक्षम नेतृत्त्वामुळे पक्षाची पिछेहाट होत आहे. अशी खरमरीत टीका शहर जिल्ह्याच्या मुख्य समितीचे सचिव प्रसाद ढगेपाटील यांनी सतीश पाटील यांच्यावर केली आहे. अत्यंत आक्रमकपणे त्यांनी पनवेल शहरात सध्या उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल आपले मत व्यक्त केले. परिणामी शहराध्यक्ष सतिश पाटील यांच्याविरोधात कार्यकरर्त्यांमधून असंतोष व्यक्त होत आहे.
प्रसाद ढगेपाटील म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत वादामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर पनवेल राष्ट्रवादीची झालेली पीछेहाट ही अध्यक्ष सतीश पाटील यांच्या अकार्यक्षमतेमुळे व नाकर्तेपणामुळे असल्याची भावना व्यक्त केली. काही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपली भावना व्यक्त केली. ती लोकांसमोर आली परंतु शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अनेक असे कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या मनामध्ये ही भावना धुमसत आहे.
पनवेल परिसरामध्ये शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु त्याची माेट बांधण्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीला अपयश आलेले आहे. गटबाजीला आलेले उधाण याला सर्वतोपरी जिल्हाध्यक्ष जबाबदार आहेत, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.
*जिल्हाध्यक्ष पातळीवर कोणताही ठोस उपक्रम राबवलेला नाही*
पक्षवाढी संदर्भात अध्यक्षीय जबाबदारी म्हणून गेल्या अनेक वर्षांमध्ये सतीश पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा ठोस कार्यक्रम किंवा उपक्रम राबवलेला नाही. एवढ्या वर्षांमध्ये काही ठराविक विभाग वगळता शहर जिल्ह्याने बूथ कमिटी सुद्धा बनवलेल्या नाहीत.
*कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न*
शहर, जिल्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती आहे. कार्यकर्ते उत्साही आहेत. परंतु, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्याऐवजी त्यांचे मनोबल कसे खच्चीकरण होईल. याकडेच जिल्हाध्यक्षांचे लक्ष असते.
एखाद्या विभागांमध्ये एखादा पदाधिकारी अत्यंत चांगले काम करत असेल आणि तिथे पक्ष वाढीस लागला असेल तर जाणीवपूर्वक पक्षाबाहेरून किंवा इतर पक्षातून एखादा व्यक्ती आयात केला जातो आणि त्या नव्या कार्यकर्त्यांची क्षमता व पक्षाविषयी निष्ठा न पाहता जुन्या कार्यकर्त्यांपेक्षा जाणीवपूर्वक उच्च पद देऊन जुन्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण केले जाते. अशी अनेक उदाहरणे शहरात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शहराध्यक्ष सतिश पाटील हेच आहेत. कार्यकर्त्यांची कर्तबगारी व पार्श्वभूमी न पडताळता सरळ जिल्ह्याची उच्च पदे बहाल केली जातात. कधी नव्हे ते शहर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागांमध्ये व शहरी विभागामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश आणि पक्ष वाढीचे काम महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरामध्ये झाले जवळपास चारशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व कोरोनाची परिस्थिती किंवा अन्य संकटाच्या वेळी सदर कार्यकर्ते जनतेच्या मदतीला धावून जाऊन पक्षाची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न युवकांनी केला. परंतु अशा गुणी कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी त्यातही गट तटाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला.
*खारघर अध्यक्षाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबीत*
खारघर शहर हे पनवेलचे महत्त्वाचे उपनगर असून, सध्या तेथे 12 नगरसेवक आहेत. त्यापैकी एकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही याठिकाणी पक्षाला बळकटी देण्याऐवजी जाणीवपूर्वक 2-2 अध्यक्ष नियुक्त करून परस्परांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही अध्यक्ष सकारात्मक चर्चेसाठी तयार असताना देखील मला खारघरचा वाद मिटवायचा नाही, अशा प्रकारची विधाने खाजगीमध्ये करून जाणीवपूर्वक पक्ष वाढीला खारघरमध्ये खिळ कसा बसेल हे पाहिले जात आहे. आणि त्यामुळे या परिस्थितीला कंटाळून ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
*अध्यक्षच नॉट रिचेबल*
पनवेलमध्ये विविध राजकीय पक्षांचे पक्षवाढीसाठी प्रयत्न चालू असतात त्यामध्ये विविध सेलची शिबिरे राबवून पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले जाते. परंतु अशा कुठल्याही प्रकारचे उपक्रम न राबवता याउलट अध्यक्ष हे नॉट रिचेबल किंवा कार्यकर्त्यांचा फोनदेखील उचलत नाहीत. याला मी स्वतः साक्षीदार आहेच आणि अनेक कार्यकर्त्यांची अशी तक्रार आहे असे मत प्रसाद पाटील यांनी व्यक्त केले.
*पक्ष वाढवण्यापेक्षा पदे रद्द करण्यावर भर*
एखादा कार्यकर्ता एखाद्या पदावर कार्य करू इच्छित असेल तर त्याला फोनवर पद दिले, असे सांगितले जाते आणि संध्याकाळपर्यंत ते पद रद्द होते. अशा प्रकारची पद्धत महाराष्ट्राच्या पाठीवर प्रथम सदर जिल्हाध्यक्षांनी कार्यकारणीमध्ये राबवली आणि मी पद दिलेच नाही, अशा प्रकारचे सूतोवाच केले जाते. प्रत्येक राजकीय पक्ष कार्यकर्त्याचे वजन व जनमाणसातील संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतो. परंतु सदर जिल्हाध्यक्षांचा बराच वेळ कार्यकर्त्यांची पदे रद्द करणे व कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका व त्यांचे पुरावे शोधण्यामध्ये आणि वरिष्ठांकडे तक्रारी करण्यामध्ये जातो.
पदे देत असताना नियमावलीचा विचार न करता पदे दिली जातात व अशा अवाजवी पदासाठी कार्याध्यक्षानी विरोध केला असता त्यांच्या सहीच्या ठिकाणी व्हाइटनर लावून अनाधिकृत पदे राजरोसपणे आणि मनमानी करून वाटली जातात.
भ्रष्ट कार्यकर्त्यांना पाठबळ
गेल्या काही दिवसांमध्ये नुकत्याच अन्य पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर जनतेतून गैर प्रकार केल्याबद्दल तक्रारी झाल्या परंतु अशा कार्यकर्त्यांना समज देणे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक अशा कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्यात आले. व ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून योग्य त्या खबरदारी ची काळजी घ्या असा सल्ला दिला असता. सदर जुन्या कार्यकर्त्यांवर धमकी व दबावतंत्राचा वापर करून मी म्हणेल तो पक्षांमध्ये कायदा चालेल अशा प्रकारची विधाने अध्यक्षांकडून करण्यात येतात, अशीही खदखद ढगे यांनी व्यक्त केली.
*प्रांत वादाला खतपाणी, मैं अलिबाग से आया हूँ…*
पनवेल शहर हे विविध जाती धर्म व प्रांतातून आलेल्या लोकांनी नटलेले आहे हे लक्षात घेऊन विविध राजकीय पक्ष सर्व जाती धर्म आणि प्रांतातील लोकांना बरोबर घेऊन त्यांचा पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करतात.
पनवेल राष्ट्रवादी कार्यकारिणीत विविध जाती धर्मा प्रांतातील लोक पदाधिकारी म्हणून आहेत. पक्षाची विचारधारा जाती-धर्म व प्रांत निरपेक्ष असतानादेखील महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून पनवेलमध्ये स्थाईक झालेल्या पदाधिकाऱ्यांना “उपरा” असा शब्द वापरून वारंवार भर मीटिंगमध्ये अध्यक्षांकडून अवमानित करण्यात येते. याला साक्षीदार आणि पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. याशिवाय त्या कार्यकर्त्याच्या मूळ जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व मंत्री यांच्यावर देखील भर मीटिंगमध्ये खालच्या पातळीवर टीका करण्यात सदर अध्यक्ष मागेपुढे पहात नाहीत. आणि गमतीची गोष्ट म्हणजे अध्यक्ष स्वतः अलिबाग परिसरातून पनवेलमध्ये विस्थापित आहेत. अशी माहिती प्रसाद पाटील यांनी दिली.
*धनदांडग्यांची पाठीराखा व कार्यकर्त्यावर अन्याय*
धनदांडग्या लोकांना आपली राजकीय मक्तेदारी संपेल या भीतीने नवोदित कार्यकर्त्यांना दाबण्याचे काम चालू आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम सतीश पाटील करत आहेत.
पनवेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष या नात्याने सर्व राजकीय पक्षाचे धनदांडग्या लोकांना खूष ठेवण्याचे काम प्रामाणिकपणे बजावत आहे.
जिल्हाध्यक्षांचे मित्रपक्ष व विरोधी पक्षातील मित्र सतीश पाटील यांच्या मैत्रीच्या दाखला देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यामध्ये लागलेले असतात. भर चौकात बसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तिथला कार्यकर्ता चालवत नसून आम्ही चालवत आहोत अशा आविर्भावात विधाने करत असतात.
पत्रकार परिषदेतही नकारात्मक विधाने
विजय मयेकर यांच्या निलंबनाला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजी संदर्भात उत्तर देत असताना, भरल्या घरात भांडणे होतात हे पत्रकार परिषदेत दिलेले विधान अत्यंत नकारात्मक आहे. भरल्या घरात लोक गुण्यागोविंदाने राहतात परंतु कदाचित हे अध्यक्ष महोदयांना मान्य नसावे, म्हणूनच कार्यकर्त्यांमधील वादाला हे पाठबळ देणारे विधान त्यांच्या तोंडून निघाले असावे.
सदर पत्रकार परिषदेस बोलावलेले कार्यकर्ते हे कोणतीही पूर्व सूचना न देता बोलल्यामुळे संभ्रमात होते व त्यातील बरेचसे कार्यकर्ते हे सतीश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची प्रतिक्रिया खाजगीमध्ये दिली.
*सत्य बोलण्यासाठी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी*
प्रसाद पाटील हे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव आहेत आणि त्यांनी तळोजा परिसरामध्ये शून्यातून पक्ष उभारणीसाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे. पक्षाचे अत्यंत सक्रिय कार्यकर्त्यांपैकी ते आहे आणि वरील मुद्दे हे अत्यंत विचारपूर्वक आणि सत्यता पडताळूनच त्यांनी मांडलेले आहेत. माझ्यावर कोणतीही कारवाई करा आम्ही पनवेल राष्ट्रवादीमधील विकृत आणि निष्क्रिय प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठविणार आहोत. आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी त्यास सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. सत्य परेशान होता हैं, पराजीत नहीं. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपण कामच करतच राहू अशी भावना प्रसाग ढगे यांनी व्यक्त केली.