करंजाडे येथे रिक्षा चालकास मारहाण
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः गावात रिक्षा चालवितो याचा राग मनात धरुन काही जणांनी एकत्र येवून एका रिक्षा चालकासह त्याच्या मित्राला मारहाण व तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे घटना करंजाडे येथे घडली आहे.
करंजाडे सेक्टर 5 ए, या ठिकाणी फिर्यादी हितेश गायकवाड (19) रिक्षा चालक, हा तेथील टपरीवर त्याचा मित्र संदीप चव्हाण असे उभे असताना 4 ते 5 जण त्या ठिकाणी आले व तो गावात रिक्षा चालवितो याचा राग मनात धरुन त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यातील एकाने चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटावर व डाव्या हातावर व कोपर्याच्या बाजूला वार केला. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या उदय काळे याला सुद्धा मारहाण केली. तसेच त्या ठिकाणी उभे असलेल्या हुंडाई एक्सेंट गाडीचे सुद्धा नुकसान केले आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.