अनेक ग्राहकांचे लाखो रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झालेल्या ज्वेलर्स मालकाचा कामोठे पोलिसांकडून शोध सुरु
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः कामोठे भागातील एका ज्वेलर्स दुकान मालकाने दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने कामोठे भागातील 8 व्यक्तींजवळचे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आपले दुकान बंद करुन पलायन केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. संतोष पवार असे या ज्वेलर्स दुकान मालकाचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील फरार झालेला एस.एस.ज्वेलर्सचा मालक संतोष पवार हा कामोठे सेक्टर-10 मध्ये राहाण्यास होता. तसेच त्याने कामोठे सेक्टर-7 मधील एक्सिस बँकेच्या बाजुला आपले एस.एस.ज्वेलर्स हे दुकान उघडले होते. त्याच भागात राहणाऱया हर्षल जाधव याचे लग्न असल्याने त्याने 2019 मध्ये संतोष पवार याला 58.800 ग्रॅम वजनाचे मंगळत्रु गंठण व 39.120 ग्रॅम वजनाचा हार बनविण्यासाठी दिले होते. त्यासाठी हर्षल जाधव याने 2 ग्रॅमचा एक कॉईन व 20 ग्रॅम वजनाच्या 2 बांगडया व रोख 1 लाख 61 हजार रुपये दिले होते. त्यानुसार संतोष पवार याने हर्षलला लग्नासाठी दागिने बनवून दिले होते. मात्र, लग्न झाल्यानंतर संतोष पावार याने सदर दागिने काही काळानंतर फिके पडतील असे सांगून त्याबदल्यात दुसरे दागिने देण्याच्या बहाण्याने हर्षलकडे सदर दागिने मागून घेतले. त्यावेळी हर्षलने देखील त्याच्यावर विश्वास ठेवून 6 लाख 29 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र व हार संतोष पवार याला दिले होते.
त्यानंतर हर्षल जाधव व त्याच्या कुटुंबियांनी संतोष पवार याच्याकडे आपल्या दागिन्यांची वांरवार मागणी केली. मात्र त्याने वेगवेगळी कारणे सांगून सदर दागिने देण्यास टाळाटाळ केली. कालांतराने त्याने हर्षलचे व त्याच्या कुटुंबियांचे फोन घेणे बंद केले. त्यामुळे हर्षल याने गत ऑक्टोबर महिन्यात त्याच्या दुकानावर जाऊन पहाणी केली असता, संतोष पवार याने आपले दुकान बंद करुन तसेच घर सुद्धा खाली करुन पलायन केल्याचे त्याला समजले. हर्षल प्रमाणेच अनेकजण संतोष पवार याचा शोध घेण्यासाठी त्याच्या दुकानावर येत असल्याचे हर्षलला लक्षात आले. त्यांच्याकडून सुद्धा संतोष पवार याने लाखो रुपयांचे दागिने घेऊन त्यांची सुद्धा फसवणुक केल्याचे आढळून आले. त्यानंतर हर्षल जाधव व इतर सात जणांनी कामोठे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संतोष पवार याच्यावर फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.