पनवेलमधील सर्व पत्रकारांना कोव्हीड लस उपलब्ध करून देण्याची पनवेल शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांची महानगरपालिकेकडे मागणी
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेलमधील सर्व पत्रकारांना कोव्हीड लस उपलब्ध करून देण्याची मागणी पनवेल शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. आपल्या हद्दीतील घटना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता मानव सेवा करीत आहेत. तरी सामाजिक बांधिलकी म्हणून एक दिवस पनवेल महानगरपालिकेने पनवेलमधील सर्व पत्रकार बांधवांना कोव्हीड लस उपलब्ध करून देवून त्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशी मागणी कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी केली आहे.