उलवे नोड मधील नागरिकांसाठी दोन नवे कोरे व्हेंटिलेटर कार्यान्वित,तहसीलदार विजय तळेकर आणि डॉक्टर बसवराज लोहारे यांच्यामुळे अवघ्या दोन दिवसात मिळाले व्हेंटिलेटर – रवीशेठ पाटील यांनी मानले उभयतांचे आभार
पनवेल (वार्ताहर)- कोरोनाविषाणू च्या आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑक्सीजन सपोर्ट सह ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना त्यांच्या त्यांच्या विभागात उपचार पद्धती प्राप्त होईल. या सिद्धांतानुसार उलवे नोड मध्ये देखील असे बेड उपलब्ध करून दिल्यास येथील नागरिकांना दिलासा मिळेल अशी जनभावना उमटत होती.
जनभावनेचा आदर करत गुरुवार दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी श्री साई देवस्थान,साईनगर, वहाळचे संस्थापक अध्यक्ष तथा रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चे अध्यक्ष रविंद्र का. पाटील व वहाळ ग्रा. पं. उपसरपंच अमर म्हात्रे यांनी मा. तहसीलदार विजय तळेकर व पनवेल महानगरपालिका उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डाँ.बसवराज लोहारे यांच्याकडे उलवे मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्हेंटिलेटरची मागणी केली होती, सदर मागणीची गरज लक्षात घेता मा.तहसीलदार व डाॅ. लोहारे यांनी नुकतीच सर्व शासकीय बाबींची पूर्तता करून आज २ व्हेंटिलेटर उलवे नोड करिता दिलेले आहेत,यात उलवे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १ व गॅलॅक्सी हॉस्पिटलसाठी १ असे २ वेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत, श्री साई देवस्थान साई नगर वहाळ,रोटरी क्लब ऑफ उलवे नोड तसेच विविध सेवाभावी संस्था/मंडळे व उलवे वासीयांच्यावतीने माननीय तहसीलदार तळेकर साहेब, माननीय मुख्य आरोग्य अधिकारी लोहारे यांचे रवीशेठ पाटील यांनी आभार मानले आहेत.