इतर पत्रकारांच्या नावाने वसुली करणाऱ्या पत्रकाराला अटक
नवी मुंबई – नामांकित पत्रकारांच्या नावाची यादी बनवुन त्याद्वारे व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या पत्रकाराला खारघर पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.अटक करण्यात आलेला पत्रकार हा नवी मुंबई काँग्रेस पदाधिकारी असून एक सफाई कामगार सुद्धा आहे.त्याने कोणाच्या साथीने वसुली पथक स्थापन केले याची पोलीस शहनिशा करत आहेत.
वीरेंद्र म्हात्रे असे अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव असून तो नेरुळ नवी मुंबईत राहणार आहे.काँग्रेस पक्षाचे तसेच सफाई कामगाराचे काम करता करता अनावधाने तयार झालेल्या वीरेंद्र म्हात्रे याला काही क्षणातच पत्रकार बनण्याची संधी मिळाल्याने त्याने त्याचाही फायदा घेतला.लॉकडाऊन काळात राजकीय नेते तसेच समाजसेवक यांच्याकडून होणाऱ्या मदतीचा लाभ मिळावा यासाठी थेट पत्रकारांना विश्वासात न घेता त्यांच्या नावाची यादी वीरेंद्र ने तयार केली व त्याच यादीच्या माध्यमातून खंडणी घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली.राजे प्रतिष्ठान कामगार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बसीर कुरेशी यांनी पत्रकारांना धान्य वाटप करण्याचे ठरवले असता वीरेंद्र म्हात्रे व त्याची सहकारी रुपाली वाघमारे यांनी इतर पत्रकारांना विश्वासात न घेता त्यांच्या नावाची एक यादी कुरेशी याना दिली.त्या यादी नुसार कुरेशी यांनी धान्य वाटप केले असता त्यातील मसाले खराब असल्याची बाब वाघमारे व म्हात्रे यांच्या निदर्शनास आली.सदर बाब त्यांनी कुरेशी यांना सांगितली असता कुरेशी यांनी ते मसाल्याचे पाकीट बदलून देण्याची तयारी दर्शवली. यावर मात्र आक्रमक भूमिका घेत वीरेंद्र म्हात्रे यांनी कुरेशी याना मीडियात बातम्या छापून तुमची बदनामी करू अशी धमकीच त्यांना दिली.त्यावर पुन्हा समजूत काढण्याचे काम कुरेशी यांनी केले असता वीरेंद्र म्हात्रे यांनी थेट त्यांना ६० हजार रुपयांची मागणी केली.जर पैसे दिले नाही तर बदनामी करू असा इशाराही त्याने दिला.सदर बाब कुरेशी व त्याचे सहकारी केवल महाडिक यांनी खारघर पोलिसांनी सांगितली असता पोलिसांनी याची दखल घेतली.गुरुवारी ११ वाजता खारघर परिसरात सापळा रचला.त्यानुसार वीरेंद्र म्हात्रे पैसे घेण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.