स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने सातार्यातील ज्वेलर्स मालकाकडून 1 कोटी 43 लाख रुपये उकळणाऱया महिलेचा शोध सुरु आरोपी महिलेने 15 पेक्षा अधिक व्यक्तींना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे उघड
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः महाराष्ट्रच नव्हे तर जम्मू काश्मिरसह इतर राज्यातील व्यक्तींना तसेच चांगल्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्या माधवी सुहास चव्हाण उर्फ माधवी ढेंबे (31) या महिलेने सातारा येथील एका ज्वेलर्स मालकाला स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने तब्बल 1 कोटी 43 लाख रुपये उकळल्याचे उघडकिस आले आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माधवी ढेंबे विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, माधवी ढेंबे या महिलेने मागील काही वर्षामध्ये 15 पेक्षा अधिक व्यक्तींची अशाच पद्धतीने फसवणुक करुन त्यांच्याकडून 10 कोटी पेक्षा अधिकची रक्कम उकळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात फसवणुक झालेले ज्वेलर्स मालकाचे सातारा येथील नागठाणे येथे दुकान आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या अमोल बडेकर याने कळंबोली येथे राहणारी माधवी सुहास चव्हाण ही महिला कस्टममध्ये अधिकारी असल्याचे तसेच ती कस्टम मधुन सोने आणुन ते मुंबईतील प्रतिष्ठित ज्वेलर्सच्या माध्यमातून बिलासहित स्वस्तात देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अमोल बडेकर व विशाल गायकवाड या दोघांनी ज्वेलर्स मालकाची माधवी चव्हाणसोबत कळंबोली येथे भेट देखील घडवून दिली होती. त्यानंतर माधवी चव्हाण उर्फ माधवी ढेंबे हिने 12. 4 किलो वजनाची सोन्याची विट ज्वेलर्स मालकाला दाखवून त्यातील काही सोने स्वस्तात देण्याचा बहाणा करुन ज्वेलर्स मालकाकडून तब्बल 1 कोटी 43 लाख रुपये उकळले. मात्र त्यानंतर माधवी ढेंबे हिने त्यांना सोने देण्यास टाळाटाळ केली होती. त्यावेळी माधवी ढेंबे व दादर येथील रमेश ज्वेलर्सचा मालक रमेश जैन या दोघांनी दिवाळी नंतर सोने देण्याचे आश्वासन ज्वेलर्स मालकाला दिले होते. मात्र त्यांनी सोने न दिल्याने सातारा येथील ज्वेलर्स मालकाने माधवी ढेंबे हिची माहिती काढली असता, ती कस्मटमध्ये अधिकारी नसल्याचे तसेच तिने अनेकांना कोट्यावधीचा गंडा घातल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक ग्न्हे शाखा युनिट-2 कडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने माधवी ढेंबे व रमेश जैन या दोघां विरोधात फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे.
चौकट
माधवीने नवी मुंबईत देखील अनेकांना कोट्यावधींचा चुना लावला आहे. यात वाशीत डान्स क्लास चालविणाऱया सोनल साखरे हिला देखील तीने कस्टममधून मिळणारी सोन्याची नाणी कमी किंमतीत विकत देण्याचे अमिष दाखवून तीच्याकडून तब्बल 95 लाख रुपये उकळले आहेत. त्यामुळे नवी मुंबई गुन्हे शाखेने तीला 2016 मध्ये अटक केली होती. त्यानंतर तीने कोपरखैरणे येथे राहणाऱया वासुदेव शिरसाठ या टॅक्सी चालकाला चार लाख तसेच वाशीत राहणारे चंद्रकांत पाळसे यांच्याकडून 20 लाख रुपये, मुंबईतील मोहम्मद अस्लम सोफा यांच्याकडून 1 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. तसेच तीने नांदेड येथील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱया उल्हास रेखापार यांना कमी किंमतीत दोन किलो सोने देण्याचे अमिष दाखवुन त्यांच्याकडून तब्बल 34 लाख रुपये उकळले आहेत.
चौकट
माधवीने जम्मु काश्मिर मध्ये देखील अशाच पद्धतीने फसवणुक केली असून जम्मु-काश्मिर पोलिसांनी तीच्या विरोधात अटक वारंट काढून तीला अटक केली होती. माधवीने ब्लॅक मनी बाळगणाऱया मुंबई व नवी मुंबईतील अनेक व्यक्तींना त्यांचा काळा पैसा सोन्यात गुंतविण्याचा सल्ला देऊन त्यांना कस्टमकडून पकण्यात आलेले सोने कमी किंमतीत देण्याचे अमिष दाखविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. तीच्या या अमिषाला बळी पडून अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी व काही नगरसेवकांनी तिच्याकडून कमी किंमतीत सोने विकत घेण्यासाठी तीला कोट्यवधी रुपये दिल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. बदनामीच्या भीतीने व माधवीला देण्यात आलेल्या रक्कमेचा तपशील उघड होईल या भितीने अनेकांनी माधवी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याऐवजी गप्प राहणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.