तौत्के चक्रीवादळामुळे पनवेल परिसरातील जनजीवन विस्कळीत
पनवेल दि.17 (संजय कदम): तौत्के चक्रीवादळामुळे गेल्या 24 तासांपासून पनवेल परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने त्यातच पडत असलेल्या पावसामुळे लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. या चक्रीवादळामुळे पनवेल परिसरात पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणच्या विद्युत तारा पडल्या आहेत. तसेच झाडे पडली आहेत. अनेक उद्योग धंदे बंद झाले असून अनेकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. अनेक ग्रामीण भागातही या चक्री वादळामुळे नुकसान झाले असून औद्योगित क्षेत्रातही या पावसाचा फटका बसला आहे. समुद्र किनारी राहणाऱया 168 जणांना आत्तापर्यंत स्थलांतरीत करण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे वेळोवेळी सावधानतेचा इशारा व माहिती देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणा वेळोवेळी संबंधितांशी संपर्क साधून आहे. त्याचप्रमाणे नुकसान होणाऱ्या भागाची माहिती घेतली जात आहे. पनवेल परिसरातील 20 घरांचे अंशतः नुकसान झाले असून पावसाचे प्रमाण 11.50 मीमी इतके आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून येत आहे.