नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल- करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे
पनवेल/वार्ताहर:आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीच्या सोबत त्याच्या नामकरणाचा वाद देखील आता उफाळू लागला आहे.नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी व्यक्त केली आहे.
पनवेल महानगरपालिकेची संरचना होत असताना पनवेलच्या सीमेलगत अगदी खेटून असणारी ही ग्राम पंचायत समाविष्ट न झाल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु या ग्रामपंचायतीचे नेतृत्व अत्यंत सजग आणि अभ्यासू सरपंच रामेश्वर आंग्रे करत असल्यामुळे येथील ग्रामीण बाज आणि सिडकोच्या वसाहती असे परिपूर्ण संतुलन राखत या ग्रामपंचायतीने अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवून दाखविले आहेत. सर्वसमावेशक समाजकारण करत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकास पर्व आरंभ करणारे रामेश्वर आंग्रे यांनी विमानतळ नाम वादाबाबत नुकतीच आमच्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की माजी खासदार स्वर्गीय दि बा पाटील हे समस्त प्रकल्पग्रस्त बांधव आणि स्थानिक भूमिपुत्र यांचे कैवारी होते. खऱ्या अर्थाने लोकनेते असणाऱ्या दि बा पाटील यांनी संघर्षाच्या माध्यमातून येथील भुमिपुत्रा ला याचे न्याय हक्क मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या संघर्षाची जाण ठेवून आपण प्रत्येकाने या विमानतळाला त्यांचेच नाव दिले गेले पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. आमच्या ग्रामपंचायतीने एक मुखाने हा ठराव पारित करून तो गटविकास अधिकारी, पनवेल यांच्याकडे पाठवून दिला आहे. आपली भूमी ही संघर्षाची भूमी आहे. परंतु तरीसुद्धा आपले लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतोय ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे. राज्य शासनाने येथील स्थानिक भूमिपुत्रांची भावना लक्षात घेऊन तातडीने नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पारित करावा.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल आमच्या ग्रामपंचायती मधील तमाम सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो.