ज्या दि बा पाटील यांच्या पुण्याईमुळे येथील भूमिपुत्र ऐशोआरामात जगत आहेत त्यांचे नाव विमानतळाला दिलेच पाहिजे
– राजेंद्र पाटील.
पनवेल/वार्ताहर : नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधावर राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 24 जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता,ज्या दि बा पाटील यांच्या पुण्याईमुळे येथील भूमिपुत्र ऐशोआरामात जगत आहेत त्यांचे नाव विमानतळाला दिलेच पाहिजे अशी परखड भूमिका मांडली.
ते म्हणाले की हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यातील कुठल्याही प्रकल्पाला देता येऊ शकेल, परंतु माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देणे योग्य होईल. प्रकल्पग्रस्तांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने दि बा पाटील यांनी आंदोलन उभारले ते महाराष्ट्रातले एकमेवाद्वितीय आंदोलन म्हणून गणले जाते. त्यांच्यामुळेच साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा हे तत्त्व प्रस्थापित झाले व पुढे जाऊन राज्याला आणि देशाला तसा कायदा मंजूर करावा लागला. आज आम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते दि बा पाटील साहेब यांचेच नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे या स्वरूपाचे ठराव करून ते राज्य शासनाला पाठवत आहोत. वास्तविक ही जनभावना आहे आणि या जनभावनेचा राज्य सरकारने आदर केला पाहिजे.
राजेंद्र पाटील पुढे म्हणाले की मी असा एकमेव कार्यकर्ता आहे ज्यानी स्वतःच्या घरात दि बा पाटील साहेब यांचा पुतळा लावलेला आहे.मी त्यांचा निस्सीम चाहता असून त्यांची प्रत्येक जयंती लोकाभिमुख कार्यक्रमांतून साजरी करत असतो.