एकता सामाजिक संस्थेची जीवनावश्यक मदत ; टॅक्सी चालक व वृद्ध फेरीवाल्यांना मूलभूत वस्तूंचे वाटप
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः कोरोनाविषाणू चे संक्रमण होऊ नये म्हणून सध्या टाळेबंदी सुरू आहे. त्यामध्ये टॅक्सी वाल्यांचे ही आर्थिक दृष्ट्या हाल झाले आहेत. व्यवसाय बुडाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा टॅक्सी वाल्यांना एकता सामाजिक संस्थेने मदतीचा हात दिला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय वयोवृद्ध फेरीवाल्यांना ही मदत करण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले आहे. कुटुंबाची कुटुंब या आजाराने बाधित झाले. शिवाय काहींना आपला प्राण गमवावा लागला. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामध्ये टॅक्सी वाल्यांचा ही समावेश आहे. परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कालावधीमध्ये त्यांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी एकता सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या माध्यमातून पाच किलो गव्हाचे पिठ, तीन किलो तांदूळ, प्रत्येकी एक किलो मुग डाळ आणि साखर अशी जीवनावश्यक वस्तूंची किट संबंधित टॅक्सीवाल्यांना देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त फेरीवाल्यांचा ही व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. हातावर पोट असणार्या या गरीब गरजूंची आर्थिक परिस्थिती दोन वेळचं जेवण घेण्याचीही राहिली नाही. त्यामधील वयोवृद्ध फेरीवाल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांनाही एकदा सामाजिक संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू देऊन एक प्रकारे मदतीचा हात देण्यात आला. गेल्या दीड वर्षांपासून एकता सामाजिक संस्था कोरोना काळामध्ये गोरगरीब गरजू ना मदत करीत आहे. याशिवाय संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा एकता च्या वतीने करण्यात आली. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याबरोबरच दवाखान्याचे अवास्तव बिल कमी करण्याचे कामही संबंधित संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.