उरण मेडिकल असोसिएशनच्या 36 डॉक्टरांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून उरण तालुक्यातील अनेक कोरोना रुग्णांचे वाचवले जीव.”आरोग्य मंत्र्यांनी उरण पॅटर्न राज्यभर राबवावा” उरण मधील जनतेची मागणी.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )आपले जीव धोक्यात घालून कोरोना सेंटर बोकडवीरा येथे रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या उरण मधील 36 हुन अधिक डॉक्टरांचा उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे सर्व डॉक्टरांचा कोरोना देवदूत अवॉर्ड 2021 ने सन्मान करण्यात आला.
वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे कोरोना सेंटर, बोकडवीरा, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे विनामूल्य सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचा कोरोना देवदूत अवॉर्ड 2021 म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी कॉम्रेड भूषण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य -वैजनाथ ठाकूर, शेकाप महिला तालुका पदाधिकारी -सीमाताई घरत,वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी,डॉ.सत्या ठाकरे,इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक -डॉ मनोज भद्रे, डॉ सुरेश पाटील,डॉ विकास मोरे(प्रसिद्ध बालरोग तज्ञ ),उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र इटकरे,सामाजिक कार्यकर्ते -संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी,रायगड भूषण मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उरण मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ विकास मोरे ( बाल रोग तज्ञ) , सेक्रेटरी डॉ सत्या ठाकरे , डॉ सुरेश पाटील यांना उरण तालुक्यातील कोवीड रुग्णालयातील डॉक्टर्स ची संख्या मर्यादित आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक , तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज भद्रे यांना एक वर्षापूर्वी एक प्रस्ताव दिला की उरण तालुक्यातील सिडको ट्रेनिंग सेंटर कोविड हॉस्पिटल बोकडवीरा, तालुका -उरण, जिल्हा-रायगड येथे आम्ही सर्व डॉक्टर्स मोफत सेवा देवू. हा प्रस्ताव डॉ मनोज भद्रे आणि तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना खुप आवडला आणि त्यांनी तो लगेच मान्यतेसाठी वरच्या अधिकाऱ्यांकडे पाठवला देखील. परंतु शासनाची त्या प्रस्तावास मान्यता मिळण्यास उशीर झाल्याने मग सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी त्यात जातीने लक्ष घालून त्या प्रस्तावास मान्यता घेण्यासाठी प्रयत्न केले. त्या प्रस्तावाचा सतत पाठ पुरावा करून त्याला मान्यता मिळाल्यावर गेली तीन महिने 36 डॉक्टर्स दिवस रात्र कोरोना सेंटर बोकडवीरा येथे विनामूल्य, फ्री मध्ये सेवा देत आहेत ही खुप मोठी गोष्ट आहे. ती सेवा देत असताना एका दिवसात चार डॉक्टर्स हजर असतात. त्यामध्ये दोन डॉक्टर्स सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत. आणि दोन डॉक्टर्स दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत सेवा देतात. ह्या सेवेमुळे आरोग्य व्यवस्था वरील ताण कमी झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड हॉस्पिटल मधील दाखल असलेल्या रुग्णांना दिवसातून कमीत कमी चार वेळा डॉक्टरांचा राऊंड होवू लागला. त्यामुळे पेशंटचा ऑक्सिजन कमी जास्त करण्याचा निर्णय योग्य पद्धतीने होवू लागल्याने सिरीयस पेशंट देखील बरे होवू लागले. हे काम करताना मर्यादित सुविधा असूनही डॉक्टरांनी कधी कसलीही तक्रार केली नाही. उलट त्या सुविधा कश्या सुधारतील त्याकडे लक्ष दिले. त्यातील एक उदाहरण म्हणजे आधी NRBM मास्क किंवा नेजल प्राँगस मास्कचा वापर होत नव्हता . पण पहिल्या दिवशीच डॉ सुरेश पाटील आणि डॉ विकास मोरे यांनी त्या वापरण्याच्या फक्त सूचना दिल्या नाहीत तर स्वतः 200 NRBM मास्क दुसऱ्या दिवशी आणून दीले. त्या एका मास्क ची मेडिकल स्टोअर मध्ये 500/- रुपयांनी विक्री होत होती, उरण मध्ये ते उपलब्धच नव्हते. डॉ साठे सर यांनी देखील फार महत्त्वाच्या सूचना केल्या. सर्व डॉक्टरांनी स्वतः फक्त वेळच दिला नाही तर स्वतः चा जीव धोक्यात घालून ही सेवा मोफत दिली, असे राज्यात कुठेच झाले नाही. त्याकरिता सर्व डॉक्टर्स ना मनापासून उरण मधील जनतेने सॅल्यूट केला आहे.असा सेवेचा उत्तम पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवावा अशी मागणी उरण मधील जनतेने केले आहे. आत्ता मात्र सर्व डॉक्टर्सची हॉस्पिटल बरोबर संपर्क वाढली असून ते एका फॅमिली चे सदस्य झाल्यासारखे वाटत आहेत. पेशंट आल्यावर हक्काने सांगतात, की मला वीर, मेहता, बोंद्रे, मढवी, तांडेल डॉक्टरांनी पाठवले आहे. आज जर पाहिले तर सिडको ट्रेनिंग सेंटर कोविड हॉस्पिटल मध्ये 42 पेशंट ऑक्सिजन वर आहेत आणि इतर हॉस्पिटल मध्ये 2 किंवा 3 पेशंट ऑक्सिजन वर आहेत. याचे कारण तेच आहे की उरण मेडिकल असोसिएशन च्या डॉक्टर्स मुळे विश्वासार्हतता वाढली असून आत्ता रुग्ण असे म्हणतात की आम्हाला दुसरीकडे कुठे जायचे नाही इथेच ट्रीटमेंट घ्यायची आहे. तिसरी लाट येण्याची संभावना लक्षात घेता लहान मुलांसाठी वेगळा वॉर्ड डॉ विकास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे . तसेच उरण मेडिकल असोसिएशन च्या मदतीमुळे सोमवारी बाय पॅप मशीनचे ट्रेनिंग असणार आहे ती देखील सुविधा या देवदूत असलेल्या डॉक्टरांमुळेच सिरीयस पेशंटना मिळणार आहे.सर्व डॉक्टर एक देवदूत असल्या प्रमाणे काम करत असल्याने वटवृक्ष सामाजिक संस्था, उलवे यांच्या तर्फे त्या सर्व डॉक्टर्सचा कोरोना देवदूत म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित नर्स, ऍम्ब्युलन्स वाहन चालक, सफाई कामगार तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, वाहन चालक, हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे कौतुक करत त्यांचे जाहीर आभार मानले.यावेळी हॉस्पिटलच्या परिसरात संस्थेच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले.