पनवेल महानगरपालिकेतील सर्व साधारण सभा आणि स्थायी समितीमधील ठराव , निर्णय तथा सभेत झालेले कामकाज याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल दि.21 (वार्ताहर):पनवेल महानगरपालिकेतील सर्व साधारण सभा आणि स्थायी समितीमधील ठराव , निर्णय तथा सभेत झालेले कामकाज याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती द्यावी अशी मागणी शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका नियमाप्रमाणे सर्व साधारण सभा आयोजित करते. सदरहू सभेत लोक हिताचे अनेक निर्णय , ठराव मांडले जातात . सभेमध्ये चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेतले जातात . सदर निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसारमाध्यम हे जबाबदारीने पार पाडतात, जेणेकरून आपण घेतलेल्या योग्य निर्णयाची माहिती जणसामान्यांपर्यंत पोचवली जाईल. परंतू काही सभेस पत्रकार मंडळींना प्रवेश नाकारण्यात येतो. सदरहू बाब ही अत्यंत असंविधानीक व अपारदर्शक आहे. आपल्या कडून संविधानिक व पारदर्शक व्यवहाराची अपेक्षा आहे. सरकारी नियमाप्रमाणे सभेचा इतिवृत्तांत , निर्णय तसेच ठराव हे संकेत स्थळावर तथा प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकांसमोर येणे गरजेचे आहे . परंतू सरकारी निर्देशाची अवहेलना करून तसे ठराव कुठेही प्रसिद्ध केले गेले नाहीत . तथा संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करून दिली नाही किंवा प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा माहिती पुरवण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे . सदरची ही बाब तुमची एकाधिकारशाही व जुलमी असल्याचे दिसून येत आहे. नियमबाह्य कारभारामुळे पनवेल महापालिकेच्या पारदर्शक व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. आपण हेतू पूरस्कररित्या एखाद्या व्यक्तीचे हित जपण्याच्या हेतूने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमाण केलेला आहे . सदरहू बाब अत्यंत संवेदनशील असून पत्रकारांना पालिकेतील कारभाराची माहिती मिळणे गरजेचे आहे . तरी आयुक्तांनी पत्रकार मंडळीस नियमांप्रमाणे विषयपत्रिका , सभेचा इतिवृत्तांत , ठराव व निर्णय याच्या प्रती प्रसारमाध्यमांना पुरवाव्यात किंवा सरकारी निर्देशाप्रमाणे संकेतस्थळावर अपलोड कराव्यात . पत्रकार मंडळींना लाईन सर्वसाधारण : व स्थायी समिती सभेचे वृत्तांकन करणेकामी सभेत सहभागी करून घ्यावेत तथा त्यांना ऑनलाईन सभेची लिंक व पासवर्ड देण्यात यावे . जेणेकरून योग्य ती माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचली जाईल. तरी वरील सर्व मागण्या लोकहितास्तव मान्य कराव्यात अन्यथा आपणा विरोधात लोक चळवळ उभारून तथा कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी . होणाऱ्या आंदोलनास तुम्ही व महापौर सर्वस्वी जबाबदार रहाल असेही महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी म्हटले आहे.
![पनवेल महानगरपालिकेतील सर्व साधारण सभा आणि स्थायी समितीमधील ठराव , निर्णय तथा सभेत झालेले कामकाज याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची शिवसेनेची मागणी](http://worldfamenews.com/wp-content/uploads/2021/06/WhatsApp-Image-2021-06-21-at-2.56.23-PM.jpeg)