फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)(सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर-उरण)तर्फे वृक्षारोपण.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे) प्रदूषण, बदललेला निसर्गाचा समतोल, बदललेलं ऋतुचक्र, यामुळे मानवी जीवनावर आणि सृष्टीवर येणारी नवनवीन संकटे यासाठी अनेक निसर्गमित्र आणि निसर्ग संस्था आपल्या परीने जे जे शक्य आहे ते निसर्ग कार्य करीत आहेत.
अशातच निसर्ग कार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असलेली उरण मधील फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर-उरण जिचे कार्यक्षेत्र उरण, पनवेल, पेण, अलिबाग, खालापूर आणि नवी मुंबई पर्यंत पसरलेलं आहे. या संस्थेने रविवार दि.20 जून 2021 रोजी चिरनेरच्या उत्तरेला बापूजी देव मंदिर परिसरात वड, पिंपळ, करंज, उंबर, सीताफळ, फणस, आंबा, काशीद,जांभूळ, चिंच, साग, चिकू अशा जवळपास 60 झाडांची लागवड केली.
या प्रसंगी फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सदस्यांसोबत फॉनच्या पुढच्या पिढीने सुद्धा सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमासाठी योगायोगाने युवराज मराठे (वनरक्षक कर्नाळा) हे त्यांच्या पत्नी पूजा मराठे यांच्या समवेत सहभागी झाले होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सोमवार आरती मंडळ(आवरे), अमित पाटील(पाणदिवे), तुषार म्हात्रे(पिरकोन), मोरेश्वर मोकल(चिरनेर), प्रशांत पाटील(चिरनेर), चंदन कडू(चिरनेर), श्रीमती पी.सी.ठाकूर(चिरनेर) यांनी झाडे देऊन निसर्गकार्यात मोलाचं सहकार्य केलं.उपस्थित मान्यवरांचे फ्रेंड्स ऑफ नेचरच्या वतीने आभार मानण्यात आले.