95 हजाराची लाच स्वीकारताना लोकसेवकासह दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः तक्रारदार याच्या घराचे घरपट्टी व अॅसेसमेंट उतारे देण्यासाठी लोकसेवकाने त्यांच्याकडे एक लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती रुपये 95 हजार आज दुपारी स्वीकारताना त्यांच्यासह दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईने सापळा रचून पनवेल एस.टी.स्टॅण्ड परिसरातून ताब्यात घेतले आहे.
पनवेल जवळील वडघर ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे लोकसेवक दगडू देवरे (54 ग्रामविकास अधिकारी, वडघर) यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी घराची घरपट्टी व अॅसेसमेंट उतारे देण्यासाठी केली होती. या संदर्भात सदर तक्रारदाराने अॅन्टी करप्शन पथक नवी मुंबई यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज दुपारी पनवेल एस.टी.स्टॅण्डच्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर ब्रिजा गाडीमध्ये ते व त्यांच्यासह सदर ठिकाणी दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश डाकी (30) या दोघांना सदर लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.