उरण पूर्व विभाग सामाजिक संस्थेतर्फे पिरकोन च्या अमित गावंड यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )
कोरोना महामारी काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन उरण पूर्व विभागातील रुग्णांना आपल्या रिक्षाने दवाखान्यात पोहोचविण्याचे निस्वार्थी काम करणाऱ्या अमित गावंड यांचा उरण पूर्व विभाग सामाजिक संस्थेतर्फे सन्मानचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि गुलाबाचे रोप देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या भयावह परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी आर्थिक दान, वस्त्रदान तर कोणी जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने अन्नदान केले.पोलिस, डॉक्टर, नर्स,सफाई कामगार, रक्तदाते अश्यांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मानही झाले, या काळात कोरोनाच्या भीतीने स्वतःचे नातेवाईक आप्तेष्ट आपल्या रुग्णालाही हात लावायला घाबरत होते पण अश्या परिस्थितीतही, अमित स्वतः रुग्णांना उचलून आपल्या मॅजिक रिक्षाने स्वखर्चाने दवाखान्यात ने आण करण्याचे धाडसाचे काम करत होता. या त्याच्या धाडसी सामाजिक कार्याने अनेक लोकांना जीवनदान दिले. त्याचे उरण तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. लोकांना मरणाच्या दारातून खेचून आपल्या मॅजिक रिक्षा मध्ये रात्री अपरात्री पोहोचविणारा एक देवदूत बनून कोरोना रुग्णांसाठी धावून आला तो अमित गावंड आणि त्याची मॅजिक.
कोरोना रुग्णांना रूग्णालयात घेऊन जाऊन त्यांना योग्य उपचार मिळतोय की नाही याची खबरदारी तो स्वतः घेत होता.उरण पूर्व विभागातील अशा या लढवय्या योध्याला पूर्व विभाग सामाजिक संस्थेने त्याला मानाचा मुजरा करत कोरोना योद्धा म्हणून त्याचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
सत्कार प्रसंगी या कार्यात अमित गावंड यांनी त्याची स्वतःची रिक्षा उपलब्ध नसेल तर किंवा रिक्षास पेट्रोलची कमतरता असेल तर त्यावेळी मोलाची मदत करणारे पिरकोन गावचे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गावंड यांचा आवर्जून उल्लेख केला, उरण पूर्व सामाजिक संस्थेमार्फत मुकुंद गावंड यांचेही आभार मानण्यात आले.
पुरस्कार प्रदान प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चेतन गावंड, उपाध्यक्ष प्रांजळ पाटील, सचिव सुनिल वर्तक, सहसचिव विद्याधर गावंड, सल्लागार अमित म्हात्रे, खजिनदार शेखर म्हात्रे, तसेच पिरकोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुरेंद्र गावंड, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र गावंड, ज्ञानेश्वर गावंड, कुणाल म्हात्रे उपस्थित होते,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सल्लागार अमित पाटील यांनी केले तर आभार सचिव सुनिल वर्तक यांनी मानले.