फिशिंग हुकमध्ये अडकलेल्या कासवाला जीवनदान.
उरण दि 12(विठ्ठल ममताबादे ) पावसाळा सुरू झाला की सर्वांनाच अगदी लहान थोरांना काहींना छंद म्हणून तर काहींना पोटाची खळगी भरण्यासाठी फिशिंग हुकने मच्छी पकडायची असते. पण यामुळे काही वेळेस मच्छी सोबत कासवे अडकतात.
असाच प्रकार पाणदिवे (उरण) येथे घडला. या ठिकाणी एका आदिवासीच्या फिशिंग हुकात एक कासव अडकले, तो ते कासव घरी घेऊन जात असताना पाणदिवे गावातील तरुण सिध्देश वेदक याने पाहिले आणि त्या आदिवासी जवळ कासवाच्या सुटकेसाठी मागणी केली असता, तो आदिवासी त्याला अर्वाच्य भाषेत बोलू लागला, त्यावेळी सिद्धेशने त्या आदिवासीला समजावून सांगत ते कासव घेऊन सागर म्हात्रे आणि साईश म्हात्रे यांना भेटला.त्यानंतर सागर, साईश आणि सिद्धेश त्या कासवाला घेऊन रायगड भूषण सर्पमित्र व वन्यजीव रक्षक, फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चे संस्थापक सदस्य जयवंत ठाकूर यांच्या दुकानात आले. थोडा वेळ प्रयत्न करून कासवाच्या मानेजवळ अडकलेला हुक काढण्यात या सर्वांना यश आले आणि त्या कासवाला जीवनदान मिळाले.
सिद्धेश वेदक, सागर म्हात्रे आणि साईश म्हात्रे एका कासवाचा जीव वाचविण्यासाठी तळमळ पाहून हे तिघे भविष्यात चांगले निसर्गमित्र बनतील असे गौरवोद्गार काढून जयवंत ठाकूर यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेतर्फे या तीन तरुणांचे आभार मानले.