बॅगेत विंचु असल्याचे सांगून बॅग घेऊन पळणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडले
पनवेल दि.18 (वार्ताहर): महिलेजवळ असलेल्या बॅगेमध्ये विंचु असल्याचे सांगुन तिची बॅग घेऊन पळून जाण्याच्या बेतात असलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सोमवारी दुपारी पनवेलमध्ये घडली. अमित अशोक नेरकर (30) असे या चोरटÎाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेतील तक्रारदार रंजना लांघे (48) या पनवेलच्या डेरवली भागात राहण्यास असून सोमवारी दुपारी त्या कामानिमित्त पनवेलमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत शितल पवार व मुमताज शहा या देखील होत्या. या तिघी पनवेल मधील यशोनारायण कॉम्पलेक्सजवळ राहणाऱया मैत्रीणीच्या घरी जात होत्या. यावेळी रंजना लांघे या तेथील गेटमध्ये प्रवेश करत असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरटÎा अमित नेरकर याने रंजना लांघे यांच्या बॅगेमध्ये विंचु असल्याचे सांगून त्यांना घाबरविले. त्यामुळे रंजना यांनी दागिने व महत्वाची कागदपत्रे असलेली आपल्या हातातील बॅग खाली टाकुन दिली. याचवेळी चोरट्या अमित नेरकर याने विंचु बाहेर काढण्याच्या बहाण्याने बॅग आपल्याकडे घेऊन त्याठिकाणावरुन पळ काढला. हा प्रकार पाहुन रंजना लांघे व त्यांच्या मैत्रिणींनी आरडा-ओरड केल्यानंतर त्या भागातील नागरिकांनी चोरट्या अमित नेरकर याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्यानंतर त्याला पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.