भवरा मोरा मुख्य क्रॉकीट रस्त्याचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते भूमीपूजन.
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे सूरू आहेत. उरण नगर परिषद हद्दीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.विकास कामे सुरू असल्याने महाविकास आघाडीच्या दरबारी नेत्यांना याचा पोटशुळ सुरू झाला आहे. त्यामुळे विरोधकांचे वेगवेगळे आरोप बिनबुडाचे आहेत. येत्या निवडणुकीत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असा विरोधकांचा खरपूस समाचार भाजप नेते तथा विद्यमान आमदार महेश बालदी यांनी भवरा येथे घेतला.
भवरा-मोरा मुख्य कॉंक्रीट रस्त्याचे भूमिपूजन सोहळा विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,शेतकरी कामगार पक्षाच्या महा विकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.आजपर्यंत मी विकास कामासाठी अनेक निधी आणले. कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. मात्र महाआघाडीच्या नेत्यांना दहा रुपयेहि निधी येथे आणता आले नाही.उलट आलेला विकासनिधी आम्हाला कसा मिळणार नाही. विकासनिधी परत कसे जाईल याच्यासाठी महाविकास आघाडीचे नेते काम करत आहेत. विविध विकास कामात अडथळे आणत आहेत. विकास कामे करण्याची ऐवजी विरोधकांवर टीका टिप्पणी करणे, वेगवेगळे आरोप करणे एवढेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची कामे आहेत. त्यामुळे ते सर्व पक्ष एकत्र आले तरी ते कधीच निवडून येऊं शकत नाही. निवडून यायला जनतेचे विकास कामे करावी लागतात मात्र कोणतेही काम व्यवस्थित न केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचा नेहमी पराभव होत आहे. पुढच्याही निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. असे उद्घाटन प्रसंगी आमदार महेश बालदी यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी,नगरसेवक राजू ठाकुर,कौशिक शहा, रजनी कोळी,आशा शेलार,नंदकुमार लांबे, भाजपा तालुकाध्यक्ष रवी भोईर,उपाध्यक्ष मुकुंद गावंड,मोरा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रवीण कोळी, माजी उपनगराध्यक्ष चिंतामण घरत,माजी नगरसेविका नंदा माजगावकर यांच्यासह भवरा मोरा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेक वर्षापासून भवरा मोरा सिमेंट क्रॉक्रिट रस्त्याची मागणी जनतेतून करण्यात येत होती या मागणीला अनुसरूनच हे काम सुरु झाल्याने भवरा मोरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.