कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत कळंबोली सर्कल येथे पुन्हा लाल काळा जुगार सुरु.
पनवेल / प्रतिनिधी : कोरोनामुळे अनेक लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून त्यातच आता लोकांचे संसार उघडयावर पाडण्यासाठी कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाल काळा जुगाराची जोरदार रेलचेल सुरू झाली आहे. कळंबोली स्टील मार्केट व कळंबोली सर्कल याठिकाणी लाल – काळा जुगार चालकांनी आपले बस्तान मांडले आहे. मात्र या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कुणाचे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे बंद झाले होते त्याचप्रमाणे कळंबोली येथे कडक व शिस्तप्रिय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी पदभार स्वीकारताच दारूबंदी, अवैध धंदे बंद केले होते. मात्र पुन्हा काही महिन्यानंतर सतीश गायकवाड यांची बदली झाल्यानंतर नुकतेच आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या कारकिर्दीत पुन्हा लाल काळा हा अवैध धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने जोरात सुरु झाला असल्याचे पाहायला मिळते. ज्याठिकाणी अवैध धंदे बंद आहेत त्याठिकाणी अवैध धंदे सुरु होतात कसे हा मोठा प्रश्नच आहे. याबाबत कळंबोली सर्कल येथे सुरु असलेल्या लाल काळा जुगाराची एक व्हिडीओ एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये टिपली व राजे प्रतिष्ठानकडे पाठवली याबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे हि व्हिडीओ देणार असल्याचे राजे प्रतिष्ठानचे केवल महाडिक यांनी सांगितले आहे.