17 सप्टेंबर, विश्वकर्मा जयंती हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करावा ही भारतीय मजदुर संघाची मागणी
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )भारतातील अग्रगण्य कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हा आणि भारतीय पोर्ट अँड डॉक मजदुर संघ व जे एन पी टी कामगार यांच्या वतीने 17 सप्टेंबर हा दिवस श्रमिक दिन व विश्वकर्मा जयंती दिवस म्हणून उरण तालुक्यातील जे एन पी टी, टाऊनशिप येथे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.या प्रसंगी कामगार मेळाव्याचे आयोजन केले गेले होते.
साऱ्या विश्वाचे शिल्पकार व वास्तूकार,ज्याने हे विश्व घडविले ,स्वर्गलोक – इंद्रप्रस्थ,द्वारका,जगन्नाथ पुरी अशी नगरे भगवान विश्वकर्मा यांनी निर्माण केली.त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत भगवान विश्वकर्मा यांना अनन्य साधारण महत्व व मान – सन्मान आहे.आपल्या देशात आज ही विविध कामे करणारे कारागीर,सुतार,लोहार,सोनार इत्यादी बारा बलुतेदार हे कोणाचेही नोकर नाहीत मात्र ते उत्तम शिल्पी आहेत . ते आजही भगवान विश्वकर्माला आपला पूर्वज मानतात. विश्वकर्मा यांच्या महानतेमुळे ती व्यक्ती राहिली नसून विविध कामे करणारे स्थापत्य – अभियंता,कला,कुसर आदी कामे करणाऱ्या व्यक्तीचे प्रतीक समजले जातात.आपल्या भारतातील बऱ्याच राज्यात विशेषतः उत्तर भारतात हा दिवस सुट्टी देऊन उत्साहात साजरा केला जातो. म्हणून हा दिवस संपूर्ण भारतात कामगार दिन म्हणून जाहीर करावा अशी 1955 पासून भारतीय मजदुर संघाची असणारी मागणी यावेळी भारतीय मजदुर संघाचे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात केली.
या प्रसंगी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या कोरोना योद्धाना सन्मान पत्रे देऊन गौरविण्यात आले.
भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय खजिनदार सुधीर घरत,उप – अध्यक्ष मधुकर पाटील, जे एन पी टी जनरल कामगार संघटना चे सरचिटणीस जनार्दन बंडा,मजदुर संघाचे नेते कॅप्टन रंजन कुमार ,तालुका अध्यक्ष लंकेश म्हात्रे इत्यादी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली
भारतीय मजदुर संघ ही कामगार संघटना देशहित,उद्योगहित व कामगार हित जपणारी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी साठी लढणारी जगातील बलाढ्य कामगार संघटना आहे.हे या कामगार मेळाव्यात अधोरेखित केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला व कामगार उपस्थित होते.