धुतुम गावच्या समस्याबाबत वैजनाथ ठाकूर यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन.
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )धुतुम गावासाठी खेळाचे मैदानासाठी आरक्षित जागा उपलब्ध करून देणे,धुतुम येथे नवीन पूल बांधण्यात यावा,धुतुम ते दिघोडे गावापर्यंत डांबरीकरण करावे या तीन प्रमुख मागणी बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी पत्र करून तसे निवेदन देऊन संबंधित समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वालटीखार येथे सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर 3 एकर जागेमध्ये भव्य क्रिडांगण तयार करणे गरजेचे आहे. तेथील लहान बालके, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच खेळाडूंसाठी मैदान आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून तरी जागा उपलब्ध करून देणे तसेच धुतुम गावाच्या पूर्वेकडील खाडीला जुने साकव बांधलेले आहे सदरचा साकव पूल पूर्ण नादुरुस्त होऊन मोडकळीस आले आहे.धुतुम येथून जाणाऱ्या येणाऱ्या शेतकऱ्यांना व शेजारील गावातील कावीळ उतरविण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी सिडकोच्या माध्यमातून नादुरुस्त झालेल्या साकवाच्या जागी पूल बांधण्यात यावा आणि धुतुम ते दिघोडे गावापर्यंत डांबरीकरण करण्यात यावे व या सर्व कामांना त्वरित मंजुरी मिळावी अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.