कोंढरी विभागात लसीकरणाची मागणी.
उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )चाणजे ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना लसीकरण चालू असून फिशरीज करंजा, मुळेखंड शाळा, बालई, कोटनाका, डाऊरनगर आदी ठिकाणी अनेकदा लसीकरण झाले आहे. मात्र करंजा येथील कोंढरी विभागात एकदाच लसीकरण झाले आहे. कोंढरी विभागात फक्त 75 जणांचेच लसीकरण झाले आहे.या विभागात एकदाच लसीकरण झाले. परत पुन्हा या विभागात लसीकरण झाले नाही. त्यामुळे कोंढरी विभागातील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.वयोवृद्ध,जेष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, अपंग व्यक्ती असल्याने ह्या व्यक्ती लस घ्यायला इतर दुसरीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन कोंढरी विभागात लसीकरण सुरु करण्यात यावे. लसीकरणसाठी नागरिकांना कोणतेही त्रास न देता त्यांच्या घराजवळ, त्यांच्या परिसरातच लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत चाणजेचे सदस्य व्यंकटेश म्हात्रे, वॉर्ड क्रमांक 6 चे सदस्य अमित भगत, सुप्रिया कोळी यांनी चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश थळी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.चाणजे उपकेंद्र आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री पेडणेकर यांचे कोंढरी विभागात लसीकरण बाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोंढरी विभागात लसीकरणसाठी सरपंच मंगेश थळी यांच्याकडेही अनेकदा मागणी करून सुद्धा कोंढरी विभागात लसीकरण करण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासन नागरिकांना त्वरित कोरोना लस द्या असे सांगत आहे.मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे नागरिक लसीकरणा पासून वंचित राहत आहेत.जेव्हा कोरोना सर्वप्रथम उरण तालुक्यात आला तेंव्हा करंजा गावातील 100 हुन अधिक व्यक्ती कोरोना बाधित झाले. तर काही जणांचे कोरोना मुळे मृत्यू झाले.कोंढरी विभागात लसीकरणाची आवश्यकता असून सुद्धा नागरिकांना लस दिले जात नाही. त्यामुळे या विभागात नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी शासन अथक मेहनत घेत आहे.तर दुसरीकडे उरण तालुक्यात अनेक ठिकाणी नागरिकांना लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकाला कोरोनाची लागण होऊन कोरोना मुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यास जबाबदार कोण ? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.