स्कुटी चालकाचा अपघातात मृत्यू
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः भरधाव वेगात असलेली स्कुटी रस्त्यावरील गतीरोधकाला आदळल्याने व गाडीवरील ताबा सुटून स्कुटी चालक रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचरा कुंडीवर धडकल्याने झालेल्या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अजय आवारे (37) हा त्याच्या ताब्यातील स्कुटी घेवून रात्री उशिरा खारघर रेल्वे स्टेशन येथून सेक्टर 12च्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना त्याला रस्त्यावरील गतीरोधक न दिसल्याने त्याची अॅक्टीव्हा गाडी गतीरोधकावर जोरात आदळली व त्याचा गाडीवरील ताबा सुटून तो बाजूला असलेल्या कचरा कुंडीवर जावून धडकला. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.