भेंडखळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )समाजात असाही एक घटक आहे. जो एका व्याधीवर संघर्ष करीत आपले जीवन आनंदाने जगत आहे.
या आजाराचे नाव आहे “थॅलेसेमिया” या आजारातील काही व्यक्तींना दर आठवड्याला, काहींना दर १५ दिवसांनी तर काहींना दर २१ दिवसांनी नवीन रक्त चढवावे लागते. या रूग्णांना वेळेवर रक्त मिळावे म्हणून अन्य संस्था प्रमाणेच घाटकोपर-मुंबई येथील समर्पण ब्लड बॅंक अनेक वर्षापासून काम करीत आहे. या ब्लड बॅंकेत जवळपास २०० थॅलेसेमिया रुग्णांची नोंद असुन यातील प्रत्येकाला माफक दरात रक्त देऊन त्यांना नवजीवन देत आहे. एवढी लागणारी रक्ताची गरज ही ब्लड बॅंक मुंबई आणि परिसरामध्ये सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करून पुर्ण करीत आहे. या मुलांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने पालवी सामाजिक संस्था, विजय-विकास सामाजिक संस्था,जरी मरीआई नवरात्र उत्सव मंडळ आणि नवतरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, भेंडखळ येथे सकाळी ९ ते २ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.थॅलेसेमिया रुग्णांकरीता आयोजित या शिबिरात सर्वांनी सहभागी होऊन रक्तदान करावे.तसेच आपल्या संपर्कातील रक्तदात्यांना या शिबिरात सहभागी करून घ्यावे असे आवाहन पालवी सामाजिक संस्था,विजय-विकास सामाजिक संस्था,जरीमरीआई नवरात्रोत्सव मंडळ,नवतरुण मित्र मंडळ यांनी केले आहे.