भारतीय मजदूर संघाचा एस टी संपाला पाठिंबा.
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 27/10/2021 पासून आपल्या विविध मागण्याबाबत आंदोलन सुरु केलेले आहे. या आंदोलनात वेतन आयोग, महागाई भत्ता या बरोबरच मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनकरण करून राज्य राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यां प्रमाणे सर्व सेवा सुविधा एस टी कर्मचाऱ्यांना मिळावेत अशा एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे संप सुरु असून विविध सामाजिक संस्था, संघटना, कामगार संघटना, विविध राजकीय पक्षांनी या संपाला जाहीरपणे पाठींबा दिला आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने एस टी संपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.तसे पाठिंब्याचे पत्र एस टी कर्मचाऱ्यांना संपाच्या ठिकाणी देण्यात आले.तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी भारतीय मजदूर संघातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनाही पत्रव्यवहार करण्यात आले आहे. यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील,राष्ट्रीय खजिनदार सुधीर घरत,जिल्हा उपाध्यक्ष मधुशेठ पाटील, कामगार नेते रंजन कुमार, उरण तालुकाध्यक्ष लंकेश म्हात्रे यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष संपाला भेट देऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.