महानगरपालिकेच्या तलावात पूर्णाकृती बुद्धांचा पुतळा तसेच कळंबोली सर्कल येथील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासंदर्भात एख लाख पोस्टकार्ड पाठवणार
पनवेल दि.17 (संजय कदम)- पनवेल महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या तलावात हैद्राबाद येथील हुसेन सागर तलावातील बुद्ध मुर्तीप्रमाणे पूर्णाकृती बुद्धांचा पुतळा उभारावा तसेच कळंबोली सर्कल येथील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात शिव फुले शाहू आंबेडकर बिरसामुंडा दि.बा. पाटील, अन्याय विरोधी कृती समितीने एक लाख मागणीचा मजकूर असलेले पोस्टकार्ड आ. प्रशांत ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना पाठविण्याचा निर्धार केला असून त्यातील 70 हजार पोस्ट कार्ड पाठविण्यात आले आहेत.
शिव फुले शाहू आंबेडकर बिरसामुंडा दि.बा. पाटील, अन्याय विरोधी कृती समितीचे तानाजी खँडागळे, सुभाष गायकवाड, नरेंद्र गायकवाड, सचिन तांबे आदींसह इतरांनी या संदर्भात पनवेल महानगरपालिकेकडे वेळोवेळी मागणी करूनही पनवेल महानगरपालिकेने या संदर्भात कोणत्याही प्रकारचा ठराव मंजूर केलेला नाही किंवा तसे नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठविले नाही. यासंदर्भात महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी पनवेल शहरासह तालुका परिसरातील बहुजनांची ताकद दिसण्यासाठी समाजातील घटकांना अशा प्रकारे पोस्ट कार्डचे वाटप करून सदर पोस्ट कार्ड पत्र पेटीत टाकत असून त्याद्वारे लोकप्रतिनिधींना व महानगरपालिकेला हे पोस्ट कार्ड पाठविले जात आहे व सनदशील मार्गाने हि समिती आपली मागणी लावून धरत आहे.