दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गांवर वाहतूक कोंडी.
उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )
उरण हे रायगड जिल्ह्यातील तालुका असून नवी मुंबई शहराला लागून असल्याने उरण तालुक्यात झपाट्याने विकास होत आहे मात्र विकासामुळे वाहनांची ये-जा सुरू असून मोठे मोठे मालवाहू ट्रक,टेम्पो, कंटेनर याची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते.जेएनपीटी हे आंतरराष्ट्रीय बंदर येथे असल्याने कंटेनर यार्डचे मोठे जाळे उरण तालुक्यात आहेत. मात्र या कंटेनर यार्डना पार्किंगसाठी जागाच नसल्याने कंटेनर चे सर्व अवजड वाहने रस्त्यावर वाकडे तिकडे कशीही लावली जातात. उरण तालुक्यातील दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभुळपाडा ते दिघोडे या मार्गावर अवैध पार्किंगमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दररोज होताना दिसत आहे.त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.नोकरीवर जाणारे, कामधंद्यासाठी जाणारे नागरिक,व्यापारी,प्रवासी, आजारी रुग्ण या नेहमीच्या वाहतूक कोंडीला कंटाळले आहेत. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने येथील नागरिकांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर रस्त्यावर कंटेनर,मालवाहू वाहने वेडीवाकडी उभी केल्याने अनेकांचा अपघात झाला आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून ही समस्या सोडविण्याची मागणी जनतेने प्रशासनाकडे केली आहे.
कोट (चौकट ):-
यार्ड वाल्यांच्या अरेरावीमुळे व काही वरिष्ठ लोकांच्या वरदहस्तामुळे दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी झालेली पाहावयास मिळत आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. एम्ब्युलन्सला सुद्धा जायला वाट मिळत नाही एवढी वाहतूक कोंडी येथे असते.यार्ड मालक जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत.येथील लोकांना मारून टाकण्याची, येथील नागरिकांना संपविण्याचे काम यार्ड मालक करत आहेत. सदर समस्या सुटली नाही किंवा या समस्याची दखल शासनाने घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– राजू मुंबईकर
सामाजिक कार्यकर्ते, उरण.