शिवसेनेच्या आजच्या मेळाव्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांच्या निवडणुक प्रचाराची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण होईल.
पनवेल /प्रतिनिधी:शीतल पाटील
खोपोली नगर पालिका निवडणूक प्रक्रियेत सामील असलेल्या प्रमूख तीन्ही पक्षाच्या भूमिकेवर आजच्या शिवसेना मेळाव्यानंतर शिक्कामोर्तब होणार आहे.खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या घडामोडींना सुरुवात झाल्यानंतर प्रथमच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकीत शेकापक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही हे स्पष्ट केले होते. त्यानंतर तब्बल तीन आठवड्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्याकडून अशाच स्वरूपाची घोषणा झाली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणाला राजकारण करता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणेनंतर दोन आठवड्यांनी शिवसेना आज आपली भूमिका माननीय मंत्री उदय सामंत यांच्या तोंडून घोषित करणार असल्याचे संकेत आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेले आहेत.
सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाने बिगुल वाजवले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तुतारी फुंकली, आज शिवसेनाही रणशिंग फुंकेल त्या आवाजाने खोपोलीत सर्व पक्षीय कार्यकर्त्यात जागर सुरू होईल. खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणनीती आखली जाईल. या तीनही पक्षांना खोपोलीच्या नगरपालिकेच्या सत्तेत मोठा दावा करायचा असल्याने तीनही पक्षांकडून आपापसात हातमिळवणी झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेना देखील आजच्या मेळाव्यात आपले पत्ते उघडणार नाही. कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काही उलथापालथ होईल ती आजच्या मेळाव्यानंतर स्पष्ट होत जाणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी, पक्षप्रवेश, तिकीट नाकारल्यानंतर ऐनवेळी होणारी पळापळ सुरू होणार आहे.
खोपोलितील तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली स्पष्ट पॉलिसी ठरवली नसली तरी, शहरातील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अंदाज – आडाखे मांडत आहेत आणि आपण ठरवू त्याप्रमाणेच आपापल्या पक्षाची राजकीय पक्षाची भूमिका असेल असे कयास बांधत आहेत, कोणी उघड उघड तर कोणी छुपे साटेलोटे करण्याचे मनसुबे रचत आहेत.
ज्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता तेव्हा नव्याने पक्ष प्रवेश होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पक्षांतर करणाऱ्यांनी सावध भूमिका घेऊन आपला निर्णय राखून ठेवला होता. तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात देखील म्हणावे तसे इनकमिंग झाले नव्हते. त्याच पद्धतीने आजही शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नव्याने शिवबंधन बांधून घेणाऱ्यांत मोठे कार्यकर्ते असतील असे वाटत नाही. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे अजून वार्ड रचना तसेच आरक्षणाचे कोणतेही अधिकृत संकेत शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ते आणि नेते निवडणूक प्रचाराच्या पहिल्या फळीत पक्षांतर करून आपला बळी देणार नाहीत. प्रचाराच्या पहिल्या फळीत घाई गडबड करून केले गेलेले प्रवेश हा आतातायीपणा ठरण्याची शक्यता आहे. त्यातही अजून युती किंवा आघाडीचे ताळमेळ जुळायचे देखील बाकी आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन आणि शिवसेनेचा आजचा मेळावा झाल्यानंतर मागील पाच वर्षात प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ, कोरोनामुळे निर्माण झालेली दूरी आता दूर होणार आहे. या घडामोडींचा परिणाम म्हणून चौकाचौकात सुरू असलेल्या बॅनरबाजीत नवेनवे चेहरे झळकत आहेत.
उद्यापासून खोपोलीच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच इतर पक्षांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची वैचारिक घुसळण करण्याचे कार्यक्रम सुरू होणार आहेत.
एकंदर काय तर आजच्या शिवसेनेच्यान मेळाव्या नंतर, सर्वच पक्षीय निवडणूक प्रचाराची अर्थात दाव्या प्रतीदाव्याची पहिली फेरी पूर्ण होईल. राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, येवून गेलेत, आता पालक मंत्री आदिती तटकरे येतील, शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे हे देखील येतील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते वातावरणात रंग भरतील, त्याच धर्तीवर राष्ट्रीय काँग्रेससह इतर पक्षही आपापली धोरणं जाहीर करतील. त्याच वेळी पक्ष प्रवेश आणि पक्षांतराला गती येईल
अब, आगे आगे देखेंगे होता है क्या ???
: गुरुनाथ रामचंद्र साठेलकर.
23 नोव्हेंबर, 2021.