शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन.महिलांचा प्रामुख्याने समावेश
पनवेल /प्रतिनिधी :मागील अनेक दशकांपासून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसून आज पुन्हा एकदा या भागातील नागरिकांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालासासमोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात प्रामुख्याने महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
मागील वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढला होता, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी २९ कोटी ३६ लाख रुपये मंजूर करून काम सुद्धा सुरू करण्यात आले होते.
मात्र ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे या कामाला गती तर मिळाले नाहीच शिवाय कामच ठप्प झाले होते.
त्यामुळे हा प्रश्न असाच प्रलंबित राहिल्याने आजही हा भाग पाण्यापासून वंचितच राहिला आहे आणि म्हणूनच या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरावा यासाठी आज पुन्हा एकदा माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले.
मात्र काही तासानंतर जीवन प्राधिकरण कार्यालयाचे अधिकारी गजबीये यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सदर पाणीपुरवठा योजना येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून खारेपाट भागाला पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे आश्वासन दिले.