अथक प्रयत्नांतू लोखंडी खांबाच्या होलमध्ये अडकलेल्या त्या सापाची सुखरूप सुटका.
खोपोली / प्रतिनिधी : शीतल किरण पाटील
खोपोली शहरात असलेल्या रिशिवन रिसॉर्टमध्ये माळी काम करणाऱ्या महिलेने एका खांबाजवळ बराच वेळ सापाची वळवळ होताना पाहीली. तिने सुरक्षारक्षकांना पाचारण केले असता एक साप खांबाच्या होलमध्ये शिरला होता, मात्र त्याचे शरीर त्या मध्ये अडकले होते. सापाने बराच वेळ बाहेर पडण्याची धडपड केल्याने त्याला जखमही झालेली होती. जखमेमुळे ना त्याला आत जाता येत होते ना बाहेर पडता येत होते. लागलीच सुरक्षारक्षकांनी सर्पमित्र दिनेश ओसवाल यांना याबाबतीत कळवले.
दिनेश ओसवाल यांनी त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या लक्षात आले की, तशा अवस्थेत बाहेर काढणे त्या सापाच्या जीवाला घातक ठरणारे होते. त्यानी समयसूचचकता दाखवत इतर सर्प मित्रांना या सापाला वाचवण्यासाठी मदतीस येण्यास सांगितले.
नवीन मोरे, अमोल ठकेकर, गुरुनाथ साठेलकर हे त्या ठिकाणी आले. पाहणी केल्यानंतर खांब कापण्याशिवाय पर्याय नव्हता हे सिद्ध झाले. मात्र ख कापणे देखील अत्यंत जिकरीचे होते. गुरुनाथ साठेलकर यांनी सर्व यंत्रसामुग्री मागवून नवीन मोरे, अमोल ठकेकर, दिनेश ओसवाल यांच्या मदतीने त्या सापाला ईजा होऊ नये याची दक्षता घेत ग्राईंडर साह्याने अगदी काळजीपूर्वक लोखंडी खांब कापण्यास सुरुवात केली.
एरव्ही साप दिसताच भंबेरी उडते मात्र या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी रिसॉर्टचे कर्मचारी आणि खुद्द मालक देखील तो साप वाचावा म्हणून जणू प्रार्थना करत होते. साधारणपणे तासाभराच्या शिकस्ती नंतर शेवटी त्या सापाला सुखरुप सोडवण्यात यश आले. याबाबतीत अनुभव असलेल्या नवीन मोरे यांनी त्या सापावर प्राथमिक उपचार करून त्याची जखम बरी होईपर्यंत स्वतः त्याची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे.
रिशीवन रिसॉर्टचे मालक अर्षद खान यानी एका मुक्या जीवाला वाचवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या सर्व मित्रांचे आभार मानून कौतुक केले.
कित्येक तास आपल्या सुटकेच्या प्रतिक्षेत असलेला तो धामण जातीचा जखमी साप आपल्याला वाचवण्यासाठी आलेल्या सर्पमित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शांतपणे उपचार करून घेत नवीन मोरे यांच्या हातामध्ये विसावला होता.
त्या धामण जातीच्या सापावर दुर्दैव घोंगावत होते मात्र सर्प मित्रांच्या जिद्दीपुढे काळ नमला होता.