गोपाळ म्हात्रे यांना रायगड भूषण दिल्याने उरण मधील नागरिकांमध्ये आनंद.
रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याने गोपाळ म्हात्रे यांच्या कला गुणांना मिळाला खरा न्याय.
उरण /प्रतिनिधी
सारडे गावातील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना त्यांच्या कलागुणांचा विचार करून अखेर रायगड जिल्हा परिषदेतील सन्मानाचा ‘रायगड भुषण’ पुरस्कार मिळाला. गेली पंधरा वर्ष आपल्या कराट्याच्या गुणांमुळे सर्वत्रच ओळख निर्माण करणारे गोपाळ म्हात्रे यांना आजवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कराट्याच्या स्पर्धांसाठी, शिबिरांसाठी गोपाळ म्हात्रे भारतभर फिरलेच पण मलेशिया आणि श्रिलंकेलाही जावून आले आहेत. असे कराटे या खेळासाठी जीवन वाहून घेणारे गोपाल म्हात्रे भरपूर पारितोषिकांचे आजवर मानकरी झाले.
परंतू आजपर्यंत ते ‘रायगड भुषण’ पुरस्कारापासून वंचित होते तोही मिळाला. उरण तालुक्यातील मुलांना, युवा पिढीला कराट्याची ओढ लावून उरणमध्ये कराट्याची क्रांती गोपाळ म्हात्रे यांनी घडवून आणली. विवीध शाळांमध्ये कराट्याचे क्लास घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणांनाही वाव देऊन त्या मुलांना स्पर्धांसाठी राज्याबाहेरही घेऊन गेले आहेत. गोपाळ म्हात्रे म्हणजे मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे, समाजसेवा करणारे कराट्याचे लोकप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख झाली आहे. सध्या ते पोलिस भरतीसाठी तरूणांना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल विचारले असता ते म्हणाले “मी १४ वर्षाचा असल्यापासून कराटे या खेळासोबत जोडला गेलो आहे. तुम्ही खेळाशी जोडले गेलात तर तुमच्या शरिरातील प्रतिकार शक्तीत वाढ होते, तुम्ही तंदरूस्त राहता हाच मी तरूणांना सल्ला देत असतो” असे गोपाळ म्हात्रे यांनी सांगितले.
अतिशय गरीब घरात फक्त शेती आणि मोलमजूरी करून दिनकर म्हात्रे यांचे घर चालत होते त्यांच्या घरात गोपाळ म्हात्रे यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जिद्दीने गोपाल यांनी बी.पी.एड. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. आजही कच्च्या , जुन्या घरात ते राहतात. गोपाळ म्हात्रे यांच्या कुटूंबाचे राहणीमान अगदी साधे आहे. पण विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी गोपाळ म्हात्रे देत असलेले योगदान फार मोठे आहे. गोपाळ म्हात्रे
‘गोशीन रयू कराटे असोसिएशन इंडिया’ या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांना वेळोवेळी महत्वाचे मार्गदर्शन मार्गदर्शक शिहान राजू कोळी पनवेल यांचे लाभले आहे.गोपाळ म्हात्रे यांना रायगड जिल्हा परिषद कडून रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने गोपाळ म्हात्रे यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.