ज्येष्ठ नागरिक राजकुमार ताकमोघे हे वयाच्या 75 व्या वर्षी झाले बीए पास
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः शिकण्याची उमेद असली तर त्या माणसासमोर त्याचे वय सुद्धा आडवे येत नाही मग त्यात तो यशस्वी होतो याचे जीवंत उदाहरण म्हणजे पनवेल शहरातील कफ नगर परिसरात राहणारे 75 वर्षीय ज्येष्ठ तरुण राजकुमार ताकमोघे यांनी या वयात सुद्धा बी.ए.ची परिक्षा देवून 69% गुण संपादन करून पदवी प्राप्त केली आहे.
शिक्षणाबद्दल असलेली आवड, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि मेहनत घ्यायची तयारी हे गुण आपल्यामध्ये असल्यास आपण आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकतो. राजकुमार ताकमोघे यांना पहिल्यापासूनच साहित्याची आवड, चौफेर वाचन, सामाजिक कार्याची आवड त्यामुळेच ते कफ या संस्थेमध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांच्या विद्यार्थी दशेत त्यांना साहित्यात पदवी घ्यायची राहिली होती. घरच्या गरीबीमुळे त्यांनी इंजिनिअरिंगला जाण्याचा निर्णय घेतला व ते सुद्धा मनापासून करून ते 60 वर्ष स्टेट ट्रान्सपोर्ट अर्थात एस.टी.मध्ये सिव्हील इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. असे असले तरी त्यांना साहित्याची पदवी घ्यायची उर्मी गप्प बसून देत नव्हती. त्यामुळे त्यांनी ते शिक्षण सुद्धा सुरू ठेवले. व जिद्दीच्या जोरावर आज वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची अपूर्ण इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि बीए.ची पदवी 69% गुण मिळवून संपादीत केली. या त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे