उप प्रादेशिक परिवहन कार्यालय – वाशी यांच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा केला गेला सन्मान
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय – वाशी, नवी मुंबई, यांच्यावतीने विविध क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला होता. महामार्गावर होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे संबंधी जनजागृती करण्याच्या हेतूने परिवहन खात्या मार्फत नेरूळ ते वाशी या दरम्यान मोटासायकल, कार, रिक्षा, स्कूल बस इत्यादी वाहनांच्या रॅलीचे आयोजनात महिला चालकांनी बहुसंख्येने भाग घेतला होता. विष्णुदास भावे सभागृह वाशी येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन केले गेले होते. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य – अविनाश ढाकणे, परिवहन उपायुक्त – अभय देशपांडे, पोलीस आयुक्त नवी मुंबई बिपीनकुमार सिंह, त्यांच्या पत्नी श्रीमती स्मिता सिंह, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी -हेमांगिनी पाटील, लेखक गायक तथा संगीत दिग्दर्शक अशोक हंडे यांच्या हस्ते नेव्ही कॅप्टन – सूनेहा गाडपांडे, पायलट – कृतज्ञा हाळे, वाहतूक विभाग अधीक्षक – सुनिता साळुंखे, उपायुक्त नवी मुंबई – सुजाता ढोले, आपत्कालीन प्रसंगी मदत करणारी भक्ती साठेलकर यांच्या सह कल्पना खेडेकर, सई पाटील, सिद्धी कडू, योगिता माने, शालिनी ठाकरे, अंजना शिंदे अशा विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सर्वच मान्यवरांनी महिलांच्या कर्तुत्वाचे भरभरून कौतुक केले.
मोटार वाहन निरीक्षक धनराज शिंदे यानी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली तर कार्यक्रमाचा शेवट हा अशोक हांडे प्रस्तुत अमृतलता या स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी साकारलेल्या संगीतमय सादरीकरणातून झाला.
परिवहन अधिकारी, पोलिस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे महिलांच्या उपस्थित संपन्न झालेला भरगच्च कार्यक्रम हा सर्वत्र चर्चेचा विषय होता.