मनसेच्या पाठपुराव्यामुळे उरण शहरातील अनधिकृत बांधकामावर उरण नगर परिषदे मार्फत कारवाई.
उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )उरण शहरातील मौजे बोरी पाखाडी, स्मशान रोड, भंगारवाला वस्तीत नवीन बांधकाम चालू होते. या बांधकामास कोणतेही शासकीय परवानगी नव्हती. हे बांधकाम अनधिकृत होते. तेंव्हा या अनधिकृत बांधकामाविषयी आवाज उठवत मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी तसेच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची भेट घेऊन सदर अनधिकृत बांधकाम व त्या ठिकाणी सुरु असलेले काम त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सदर अनिधिकृत बांधकाम व सुरु असलेले काम त्वरित बंद करावेत असे निवेदन उरण नगर परिषद व उरण पोलीस स्टेशनला दिले. सदर अनिधिकृत बांधकाम बंद झाले नाही तर या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्वरित तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मनसेचे निवेदन प्राप्त होताच मनसेच्या मागणीची दखल घेत मनसेची मागणी मान्य करत उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी उरण नगर परिषद हद्दीतील मौजे बोरी पाखाडी, स्मशान रोड, भंगारवाला वस्ती येथील सुरु असलेले अनधिकृत बांधकाम त्वरित बंद केले. व त्याविरोधात कारवाई केली.
मुख्याधिकारी संतोष माळी यांना तसेच उरण पोलीस स्टेशनला मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उमेश वैवडे, रितेश पाटील, दिनेश हळदणकर, गणेश तांडेल, दिपक पाटील, सतीश पाटील आदी मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते. या निवेदनाची, मनसेच्या मागणीची मुख्याधिकारी संतोष माळी यांनी तसेच उरण पोलीस स्टेशनने दखल घेतल्याने मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी संतोष माळी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांचे आभार मानले.