नावडे फाटा उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडीतून होणार सुटका
पनवेल दि.१४ (वार्ताहर) : तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, येत्या आठवड्याभरात पूल वाहतुकीसाठी खुले केला जाण्याची शक्यता आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यामुळे नावडे परिसरातील रहिवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
पनवेल-मुंब्रा मार्गावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यात नावडे फाटा येथून तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे नावडे फाट्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. तसेच रस्त्यालगत असलेली शाळा, नावडे गाव आणि वसाहती मधील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी करावी लागणारी कसरत, वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या किरकोळ अपघाताच्या वाढत्या घटनांची नोंद घेवून ३ वर्षांपूर्वी ७० कोटी रुपये खर्च करुन ‘एमएसआरडीसी’ने नावडे फाटा येथे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु केले होते. दोन वर्षात काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, ‘कोरोना’ मुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी आणि नावडे ग्रामस्थांना गावातून बाहेर पाडण्यासाठी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे काही दिवस उड्डाणपुलाचे काम बंद होते. अखेर नावडे गावालगत पादचारी भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेवून सुरु झालेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला जवळपास नव्वद पथदिवे उभारण्यात आले आहेत. उडाणपुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे नावडे फाटा येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार असल्याने नावडे परिसरातील रहिवासी आणि वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत. दरम्यान, नावडे फाटा येथील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या आठवडाभरात पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.
नावडे उड्डाणपुलामुळे थेट येणारी वाहने रोडपाली सिग्नलवर थांबणार आहेत. त्यामुळे चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे सदर सिग्नलवर वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे शासनाने रोडपाली सिंग्नलवर उड्डाणपुल उभारावा, या मागणीचे पत्र नवी मुंबई पोलीस उपायुक्त यांच्याकडून शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
कोट : नावडे फाटा येथील उड्डाणपुलामुळे स्थानिक ग्रामस्थांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. नावडे फाटा दरम्यान वाहतूक सुरळीत होणार आहे. नावडे गाव समोरील रोडपाली सिंग्नलवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मात्र, असून, शासनाने सदर ठिकाणी उड्डाणपुल उभारणे आवश्यक आहे. – महेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक तळोजा वाहतूक विभाग.
फोटो : पूर्णत्वास आलेला उड्डाणपूल