*निल्स लेक व्ह्यू सोसायटीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
*नवी मुंबई-*
बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट घटना दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे देशातील सर्वोच्च व्यक्ती आहेत. संपूर्ण जगभरात बाबासाहेबांचे सर्वाधिक पुतळे आहेत. त्यांनी गरिबीतून, हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले. सर्व पिढ्यांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे जीवनकार्य सर्वांनी अभ्यासले पाहिजे. तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूर माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांनी केले. ते खांदा कॉलनी येथील निल्स लेक व्ह्यू सोसायटीत आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवानिमित्त बोलत होते.
निल्स लेक व्ह्यू सोसायटीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ज्ञानदिन साजरा करण्यात आला, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. विशेषत्वाने लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार, महत्व कळावे यासाठी ‘मला कळलेले बाबासाहेब’ या विषयावर इंग्रजी व मराठी भाषेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
२००६ साली निल्स लेक व्ह्यू सोसायटीची स्थापना करण्यात आली असून यावर्षीपासून आंबेडकर जयंती साजरी करण्यास सुरुवात आहे. यावेळी सोसायटीतील लहान मुलांनी आंबेडकरांविषयी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला कोल्हापूर माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.संभाजी खराट तर अध्यक्षस्थानी कोकण विभाग माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या रचना त्रिपाठी, क्रीष्णा सिंह, रुमा घोष आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी धनंजय गायकवाड यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.
चौकट:
डॉ.आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सोसायटीत लायब्ररी बनवण्याचा संकल्प करण्यात आला. या संकल्पनेचे सभासदांनी स्वागत केले. ग्रंथालयाला डॉ.गणेश मुळे यांनी २५ पुस्तके देण्याचे जाहीर केले असून ते या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देखील सांभाळणार आहेत. यावेळी सर्व सभासदांनी डॉ.गणेश मुळे यांचे आभार मानले.
कोट:
आपण पर्यटन स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, तीर्थक्षेत्रे आदी ठिकाणी फिरायला जातो. त्याप्रमाणेचा महापुरुषांची जन्मभूमी, कर्मभूमी, ऐतिहासिक स्थळांनाही भेट देणे आवश्यक आहे. त्यातून आपल्या मुलांना महापुरुषांचे विचार कळतील. प्रत्येकाने आपला धर्म केवळ उंबऱ्यापर्यंत ठेवा, उंबरठ्याच्या बाहेर पडल्यावर लोकशाही जीवनात व समूहात काम करतो याचे भान जपले पाहिजे. घराबाहेर पडल्यावर आपण समूहाचे घटक आहोत याची जाणीव बाळगून वागल्यास कोणताही धर्म एकमेकांना तारक-मारक ठरणार नाही. संवाद हे एक माध्यम आहे. ते दुसऱ्या संवाद माध्यमाला अधिक सशक्त करते व त्याची परिणामकारकता वाढवते. एकमेकांच्या चांगल्या विचारतुन आपण आपली प्रगती करू शकतो, हे समूह जीवनाचे तत्व आहे.
– डॉ.गणेश मुळे, उपसंचालक- माहिती जनसंपर्क कोकण विभाग