- अखेर सुमितला मिळाला मदतीचा हात.एक किलो वजनाची काढली गाठ
पनवेल /प्रतिनिधी
सुमित दिनानाथ राय हा मुलगा नागोठणे येथील रहिवासी असून लहानपणापासून त्याच्या डाव्या हाताच्या खाली गाठ होती. वयानुरूप ती गाठ वाढत गेली आणि त्यामुळे त्याचा त्रासही वाढत गेला. घराची हलाखीची परिस्थिती त्यात मुलाला होनारा त्रास या सर्व गोष्टीमुळे हताश झालेल्या मुलाच्या पालकांना अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळा- नागोठणे येथील मुख्याध्यापिका- राजेश्री शेवाळे यांनी इयत्ता २ री मध्ये शिकत असलेल्या या विद्यार्थ्याला शालेय आरोग्य तपासणीत संदर्भित केले. पंचायत समिती- रोहा अंतर्गत गट शिक्षण अधिकारी- सादुराम बांगारे, शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले समग्र शिक्षा अभियान, समावेशीत शिक्षण विभागातील कार्यरत टीम आणि सर्व साधनव्यक्ती व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था-पनवेल मा. प्राचार्या, तसेच समता विभाग प्रमुख- मा. तुपे सर, व समावेशीत जिल्हा समनव्ययक श्री.विशे सर यांच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नाने सुमित यास अखेर सर्वांच्या मदतीने डॉ. भुसारे (सर्जन) एम. जी.एम.हॉस्पिटल, कामोठे- पनवेल यांच्या प्रयत्नाने अखेर दि.४/४/२०२२ रोजी पहिली शस्रक्रिया पार पडली. जवळपास १ किलो वजनाची गाठ काढण्यात आली. तसेच दुसरी शस्त्रक्रिया दि. १२/४/२०२२ रोजी ही सुद्धा यशस्वीरित्या पार पडली. या यशस्वी शास्त्रक्रिये मुळे सुमितचे पालकही गहिवरले. त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू सर्व काही सांगून गेले.
सदर पालक हे परप्रांतीय असून अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता असल्यामुळे जवळपास एक महिना पासून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट ठेवले होते. लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे त्यात खूप वेळ गेला. या सर्व अडचणी लक्षात घेऊन विशेष शिक्षक भानुदास आमले सर यांच्या विशेष प्रयत्नांने ही शस्त्रक्रिया अखेर यशस्वी पार पडली. ऑपरेशन झाल्यानंतर अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहेत.
या सर्व गोष्टी पार पाडत असताना जिल्हा रुग्णालय- अलिबाग येथे कार्यरत असलेले पंकज मोरे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्वांच्या मदतीचा हात मिळाल्याने व शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याने सुमितच्या पालकांचा व इतरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.