खोपोलीतील सर्पमित्रांनी केली भल्या मोठ्या अजगराची संकटातून सुटका.
खोपोली /प्रतिनिधी :
खोपोली शहरातल्या मुंबई पुणे जुन्या महामार्गा लगत जुन्या हायको कंपनीच्या शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम क्षेत्रात कामगारांना दिनांक 4 जुलै रोजी अजगर जातीचा साप आढळून आला. त्यानी लागलीच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेतील सर्पमित्र सुनील पुरी आणि योगेश औटी यांना त्याबद्दल माहिती दिली. सर्पमित्र त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या सापाला सुरक्षित पकडले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्या सापाच्या अंगात त्याच्या जाडी पेक्षाही कमी आकाराची पीव्हीसी पाईपची रींग अडकली होती. कदाचित त्यामुळे त्याच्या हालचालीवर परिणाम झालेला दिसून येत होता.
सुनील पुरी आणि योगेश औटी यांनी ती पाईपची रींग काढण्याचा निर्णय घेतला. तो अजगर आकाराने भला मोठा होता त्यात ती रिंग कमी आकाराची असल्याने ती अक्षरशः त्याच्या अंगात रूतून बसली होती. ती रिंग काढत असताना त्याला जखम होण्याची शक्यता होती मात्र त्या दोघांनी अत्यंत सावधपणे ती रिंग कापून काढली आणि अजगराला त्या पाशातून मुक्त केले. अशा अवस्थेत त्या अजगराला आपले भक्ष्य गिळणेही शक्य होत नसावे. तो या पाशात किती दिवस अडकून होता हे जरी माहीत नसले तरी दैवयोगाने तो या सर्व सर्प मित्रांच्या हाती लागला आणि त्याला त्यातून मुक्तता मिळाली.
प्राणीमात्रांच्या अधिवासात मानवाने अतिक्रमण केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. त्यात अन्न पाणी शोधण्याच्या नादात जशा गाय वासरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशव्या जात असतात त्याच प्रमाणे हा अजगर त्या पाईपाच्या रिंग मधे अडकला असावा. जागरूक सर्पमित्रांच्या प्रयत्नाने त्या अजगरावरचे संकट टळले.
अत्यंत कुशलतेने कोणतीही इजा होऊ न देता अजगराची मुक्तता केल्याबद्दल सुनील पुरी आणि योगेश औटी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या अजगराला सुरक्षित वनक्षेत्रात रिलीज केल्याचे फार मोठे समाधान या घटनाक्रमात योगदान दिलेल्या सर्वांना निश्चितच लाभले आहे.

