पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाचा उटणे प्रकल्प
पनवेल दि. १३ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे उटणे प्रकल्प बंद केला होता. या काळांत सर्वच कार्यक्रम बंद असल्याने उत्पन्नाची सर्व साधने बंद होती, मात्र आता कोरोनाची साथ आटोक्यात येत असून सर्व कार्यक्रम शासनाने खुले केले असल्याने, पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाच्या नव्या कार्यकारिणीने पुनःश्च दिवाळीसाठी उटणे प्रकल्प व मकर संक्रांतीसाठी तिळगुळ बनविण्याचा संकल्प केला आहे.
संघाने बनविलेल्या उटण्याची संघाच्या सभासदांबरोबरच शहरातील अनेक कुटूंबाकडून गेली दोन वर्षे मागणी होत होती, तसेच काही संस्थांकडूनही संघाच्या या प्रकल्पाला उदंड प्रतिसाद लाभला होता. संघाच्या या प्रकल्पांतून सभागृहाच्या व्यवस्थेस आर्थिक हातभार लागत होता. हा प्रकल्प संघाचे सर्व सभासद राबवीत असल्याने आता पुन्हा एकदा संघाच्या उटण्याचा घमघमाट व तिळगुळाचा गोडवा लाभणार आहे.सभासदांनी प्रत्यक्ष हजर राहून या प्रकल्पांना पूर्वीच्या सहकार्याप्रमाणेच साहाय्य करावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष जयंत गुर्जर व सचिव सुनिल खेडेकर यांनी केल्याचे अनंत सिंगासने यांनी सांगितले.