कळंबोलीत हजारो रुपयांचा गुटखा साठा जप्त
पनवेल दि.२७(वार्ताहर): कळंबोली वसाहत परिसरातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटने प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या चार पान टपऱ्यांवर छापा मारून हजारो रुपये किंमतीचा गुटखा व पान मसाला जप्त केला. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने सर्व पान टपऱ्या सील करून चारही चालकांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटने कळंबोली से. १ मधील अरविंदकुमार दुबे, बल्लू राजबहादुर चौरसिया, राजेद्र चव्हाण, अनंतलाल गुप्ता यांच्या पान टपऱ्यांची तपासणी केली. या सर्व पान टपऱ्यांमध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधीत सुपारी असा हजारो रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने त्यांच्याकडे खरेदी बिलांबाबत तसेच पुरवठादारांबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने चारही पान टपरी चालकांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात चारही चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.