अखेर अनधिकृत मदरसाला पालिकेचे टाळे
साईनगर येथील रहिवाश्यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहरातील साई नगर येथील न्यू साईकृपा गृहनिर्माण संस्थेच्या दोन वाणिज्य गाळ्यात मूळ रचनेत बदल करून मदरसाचे बांधकाम सुरु असल्याचा संशय सोसायटीमधील रहिवाश्याना आल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन हे बांधकाम त्वरित थांबवावे व सदर गाळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सील करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी पनवेल महानगरपालिका तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे येथे वारंवार केली होती. कोणतीही परवानगी नसताना साई नगर येथील न्यू साईकृपा गृहनिर्माण संस्थेच्या दोन वाणिज्य गाळ्यात मूळ रचनेत बदल करून याठिकाणी बेकायदा मदरसा सुरु केला गेला असून गणेशोस्तवाच्या पाहिल्या दिवसापासून तो वापरण्यास सुरुवात केली गेली होती. मात्र सोसायटीमधील व परिसरातील नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर पनवेल महापालिकेने MRTP ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून सदर मदरसाला सील करण्यात आले आहे. याबाबत पनवेल महापालिका अधिकाऱ्यांशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.