महामार्ग वरील सर्विस रोड स्थानिकांसाठी खुले करण्याची अतुल भगत यांची मागणी.
उरण दि 20: जे.एन.पी.टी ते पळस्पे तसेच जे.एन.पी.टी ते आम्रमार्ग या महामार्गावरील सर्विस रोड स्थानिक, नागरिकांना वाहतुकीसाठी मोकळा करून न दिल्याने तसेच बेकायदेशीर पार्किंग मुळे आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे अपघातात बळी गेले आहेत.त्यामुळे जे.एन.पी.टी ते पळस्पे तसेच जे.एन.पी.टी ते आम्रमार्ग या महामार्गावरीत सर्विस रोड स्थानिक, नागरिकांना वाहतुकीसाठी मोकळा करून द्यावे अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
रायगड मधील उरण तालुक्यातील जे. एन .पी.टी(जेएनपीए )बंदरातील येणाऱ्या-जाणाऱ्या कंटेनर्स ची वाहतूक वेगवान तसेच सुकर होण्यासाठी वर्षा पूर्वी जे. एन. पी. टी ने सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्च करून महामार्ग तयार केला आहे. तसेच उरणहून पनवेल, नवी मुंबई, ठाणे, पुणे येथे जाण्या-येण्यासाठी महामार्गाला समांतर असा सर्व्हिस रोड सुद्धा तयार केला आहे.दुर्देवाने सध्या या दोन्ही महामार्गालगत असलेले सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग मुळे 24 तास वाहने उभी असतात. या सर्व्हिस रोडच्या बाजूने अनेक अनधिकृत कंटेनर्स यार्ड्स आहेत. व त्याची वाहतूक सुद्धा याच सर्व्हिस रोड मधून होत होत आहे. त्यांची बाहेरून आलेली वाहने सुद्धा याच सर्व्हिस रोडवर उभी केली जातात.परिणामी स्थानिक नागरिकांना तसेच मोटर सायकल, रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना मुख्य महामार्गावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.या अनधिकृत कंटेनर्स यार्डमुळे अपघात तसेच वाहतूक कोंडी होत असताना या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडुन कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. या महामार्गात काही ठिकाणी मार्ग अजूनही पूर्ण न झाल्याने सतत वाहतूक कोंडी होते . या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच जेएनपीटी प्रशासनाशी अतुल भगत यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे.तसेच अनेक बैठका सुद्धा घेतल्या आहेत परंतु अजून पर्यंत या अनधिकृत पार्किंग व अनधिकृत कंटेनर्स यार्डवर कोणतीही कारवाई झालेली नाही.महामार्ग लगत व महामार्गावर उभे असलेल्या अनिधिकृत वाहणावर, बेकायदेशीर पार्किंग वर त्वरित योग्य ती कारवाई करावी अन्यथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात उग्र आंदोलन उभारले जाईल असा आक्रमक इशारा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी प्रशासनाला दिला आहे.