माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह आंदोलनकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात, जमीन फुकटात देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा
पनवेल प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. देवद येथील जय हनुमान क्रिकेट मैदान येथे नैना तर्फे प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी माजी आमदार बाळाराम पाटील, जी आर पाटील, राजेश केणी, सुभाष भोपी, नामदेव फडके, अनिल ढवळे, नरेंद्र भोपी, शेखर शेळके यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलनाला सुरुवात केली व प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाला जाहीर विरोध केला. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता प्लॉट हस्तांतरणाचा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा बोलावण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवत हा कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
देवद येथील सर्वे नंबर ७८/० या जागेचा नैनातर्फे प्लॉट हस्तांतरण करण्यात येत होते. याला येथील शेतकरी बांधवांनी प्रखर विरोध केला. वेळ पडली तर रक्त सांडवू, मात्र जमीन फुकटात देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी देखील शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट केली आणि या प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाला जाहीर विरोध दर्शवला. हा प्रकल्प होऊ देणार नाही, आपण अटक करून घेऊया अशी रोखठोख भूमिका जी आर पाटील यांनी मांडली. शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकर्र्यालाच राहावे लागेल असे सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सर्व्हे बंद करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या काळात प्रकल्पग्रस्तांची ताकद वाढवून आंदोलन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना जर जमीन द्यायची नसेल तर हिटलर शाहीने जमीन ताब्यात घेणार का असा सवाल नरेंद्र भोपी यांनी विचारल्यानंतर सिडको (नैना) अधिकारी निरुत्तर झाले.
नैना ही उद्योगपतीला विकले गेले आहे का आणि कायद्याचे रक्षक हे भक्षक झाले आहेत का? असा सवाल पाटणकर यांनी केला. यावेळी अनेकांनी आमची जमीन फुकट न घेता जमीन अधिग्रहण करा असे ठणकावून सांगितले. यावेळी महिलांनी आमची जमीन फुकट घेणाऱ्या नैना अधिकाऱ्यांना तळतळाट लागेल अशा शिव्या शाप दिल्या. तर सुकापूर येथे 30 माळ्याची ईमारतीचे काम सुरू आहे. त्याला विमान अडकणार नाही आणि शेतकऱ्यांनी बांधलेल्या चार माळ्याच्या इमारतीला कोणते विमान अडकणार आहे असा सवाल राजेश केणी यांनी उपस्थित केला. यावेळी नैनासोबत नियोजन बैठक लावण्याची मागणी करण्यात आली. तर 78/0 सर्व्हे नंबर असलेला प्लॉट 23 कोटी रुपयांना विकला गेला असल्याचे सांगण्यात आले.
आम्हला आमची शेती द्यायची नाही, हे काँक्रीट जंगल कशासाठी उभारणार आहेत. टाऊन प्लॅनिंग ऑफिसरला जोड्याने मारायला हवे असे एड. सुरेश ठाकूर यांनी भाषणात सांगितले. वेळ आली तर रक्त सांडवू आणि स्थानिकांचा विचार न करता इतरांचा विचार केला तर वेगळ्या पद्धतीने आम्हाला विचार करावा लागेल व स्थानिकांचा विचार करूनच पुढचं निर्णय घ्या अन्यथा पुढचे आंदोलन उग्र असेल असा इशारा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिला. सिडकोच्या माध्यमातून मिटिंग लावण्यात येणार असल्याचे दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले.