ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची हत्या त्याच्या पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने केल्याचे आले उघडकीस
पनवेल दि.१४ ( वार्ताहर ) : कळंबोलीतील : ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक जसपालसिंग निषत्तरसिंग खोसा ऊर्फ पालसिंग (४८) याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ही हत्या त्याच्या पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी जसपालसिंगची पत्नी व तिचे दोघे नातेवाईक अशा तिघांना अटक केली आहे.
जसपाल सिंग खोसा उर्फ पालसिंग हा कळंबोली से – ४ मधील साईनगर सोसायटीत कुटुंबासह राहत होता. गत सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या पाळीव कुत्र्याला उद्यानामध्ये फिरविण्याठी कळंबोली से – ६ मधील सिडको उद्यानामध्ये गेला होता. या दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी जसपालसिंगची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळंबोली पोलिसांना घटनास्थळी धाव घेत अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित व्यक्तींबाबत माहिती मिळवली. या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद आढळून आलेल्या व्यक्ती जसपाल सिंगचे नातेवाईक असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची पत्नी दलजित खोसा (३८) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता, पती पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याने पंजाब येथील चुलतमामा जस्सी उर्फ जग्गा व त्याचा मित्र या दोघांच्या मदतीने पती जसपालसिंग खोसा याची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दलजित खोसा हिला अटक करून पंजाब येथे पळून गेलेल्या जस्सी उर्प जग्गा व त्याचा मित्र या दोघांना पंजाब येथून अटक केली.तत्पूर्वी जसपाल सिंग याची पत्नी दलजित खोसा ही १५ दिवसांपूर्वी पंजाब येथे गेली होती. त्याठिकाणी तिने चुलत मामा जस्सीची भेट घेऊन पतीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार जस्सी त्याच्या एका मित्रासोबत हत्येच्या चार दिवसांपूर्वी पंजाब येथून नवी मुंबईत आला होता. त्यावेळी दलजितने त्या दोघांना आपल्या घरी न ठेवता, त्यांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती. सकाळी जसपालसिंग हा आपल्या पाळीव कुत्र्याला उद्यानामध्ये फिरवण्यासाठी घेऊन गेल्यानंतर त्याची माहिती दलजितने जस्सीला दिली. त्यानंतर त्या दोघांनी उद्यानामध्ये जाऊन जसपालसिंगवर धारधार शस्त्राने १४ वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर दोघेही रेल्वेने पंजाब येथे पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
फोटो – मयत जसपाल सिंग खोसा