पर्सनल लोन तात्काळ देतो असे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीस एपीएमसी पोलिसांनी केले जेरबंद.
पनवेल / प्रतिनिधी : पर्सनल लोन तात्काळ देतो असे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीस एपीएमसी पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले आहे. आकृती फायनान्स सर्व्हिसची पत्रके देऊन ग्राहकांना आकर्षित करून व त्यांनतर विजय दीप सहकारी संस्था मर्यादित या सोसायटीचे बोगस प्रमाणपत्राचा वापर करून विविध कारणे दाखवून ग्राहकांना लोन मिळवून देतो म्हणून टप्प्याटप्याने पैसे घेणाऱ्या व फसवणूक करणाऱ्या टोळीला अखेर एपीएमसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहित सुसेन नागवेकर, भालचंद्र रघुनाथ पालव, ओंकार रवींद्र हटले हे आकृती फायनान्स कंपनीची बोगस पत्रके छापून व या पत्रकारांवर असणाऱ्या ९१३६१६७१३३ या संपर्कावर संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक नमूद करून लोन घेणाऱ्या इच्छुक व्यक्तीने या मोबाईलवर संपर्क केल्यांनतर गॉड गॉड बोलून लोन देण्याबाबत माहिती देत असत व आकर्षित करीत असत. इच्छुक व्यक्तीने भेटण्याकरिता बोलाविल्यानंतर त्याला भेटण्यासाठी फोक्सवॅगन वेंटो या आकारमधून जात असत जेणेकरून कस्टमरवर आपला प्रभाव पडावा त्यानंतर कस्टमरची प्राथमिक माहिती घेऊन विजयदीप सहकारी संस्था मर्यादित डहाणूचे बोगस प्रमाणपत्र दाखवून या संस्थेचे सभासद शेयर होल्डर होण्याकरिता भाग पडत असत जेणेकरून त्या संस्थेकडून ते कस्टमरला लोन मिळवून देतील अशी खोटी माहिती देत असत त्यानंतर सभासद होण्याकरिता पैसे घेतल्यानंतर त्यांना त्या बाबतच्या बनावट पावत्या द्यायचे व कस्टमरचा विश्वास संपादन करायचे पुन्हा मोठ्या रकमेचा लोन इन्शुरन्स काढावा लागेल यासाठी पैसे द्यायचे त्याचप्रमाणे विविध इतर कारणांसाठी ग्राहकांकडून ते पैसे घेत व कस्टमरची फसवणूक करून पळून जात असत. असले अनेक प्रकार या टोळीने केले असून सदर टोळी जेरबंद केल्याने याबाबतचे घडलेले गुन्हे उघडकीस येतील व पुढे गुन्ह्यांना आळा बसेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विनायक वस्त यांच्या मार्गदर्शानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, सपोनि भूषण पवार, पोहवा कदम, खैरे, पोना पाटील, ठोंबरे, म्हात्रे, पवार, पोशि गायकवाड यांनी पार पाडली. या कारवाईत एपीएमसी पोलिसांनी एक फोक्सवॅगन कार, एक नॅनो कार, विजयदीप सहकारी संस्था मर्यादित डहाणूचे बोगस प्रमाणपत्र, बोगस शिक्का, लोकांना आकर्षित करण्यासाठी छापलेली आकृती फायनान्स सर्व्हिसची पत्रके, बँक पासबुक, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे हस्तगत केली आहेत.