रे एज्युकेशन सोसायटी रेनबो किड्स स्कुलच्या वतीने टावरवाडी येथे शिक्षक दिन साजरा.
पनवेल / प्रतिनिधी : दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘गुरु’ यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. पनवेल तालुक्यातील टावरवाडी या आदिवासी वाडीवरील मुलांसोबत रे एज्युकेशन सोसायटी रेनबो किड्स स्कुल यांनी शिक्षक दिन साजरा केला. यावेळी येथील मुलांना चित्रकलेचे धडे देण्यात आले व प्रत्येक मुलाला चित्र रंगविण्यास सांगितले होते या उपक्रमास लहान मुलांनी उत्तम प्रतिसाद देत उत्कृष्ठ चित्रे काढली. यावेळी रे एज्युकेशन सोसायटी रेनबो किड्स स्कुलतर्फे प्रत्येक विद्यार्थ्यास चित्रकला करण्यासाठी चित्रबुक, कलर पेटी, पेन्सिल या शैक्षणिक साहित्यांचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी रे एज्युकेशन सोसायटी रेनबो किड्स स्कुलच्या आयेशा रणदिवे, याकूब रणदिवे, राजे प्रतिष्ठान रायगड जिल्हा संघटक प्रमुख केवल महाडिक, चित्रकलेचे शिक्षक चंदन गडगे, नृत्य शिक्षक निखिल सादराणी, अमित पंडित, ओमकार महाडिक व गावातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.