अल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस
खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात घडला होता गुन्हा
गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक2 ने दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
पनवेल/ प्रतिनिधी:- खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा प्रकार घडला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेचा कक्ष क्रमांक दोनच्या पथकाने दोन दिवसात हा गुन्हा अत्यंत शिताफीने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलीसांनी दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांनी इतर गुन्ह्यांची ही कबुली दिली आहे.
10 सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या कडून खांदा कॉलनीकडे जाणारे रस्त्यावर १७ वर्षीय मुलास जबरीने लुटण्यात आले. त्याच्याकडील १७ , ९९९ किमतीचा रियल मी कंपनीचा प्रो मॉडेलचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला . या प्रकाराबाबत कामोठे पोलीस ठाण्यात कलम ३ ९ २,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह , सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटील सुरेश मेंगडे ,सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांनी सदरचा गुन्हा विनाविलंब उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले . या गुन्हयातील आरोपींनी शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षे वयाचे अल्पवयीन बालकास जबरीने लुटलेले असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेण्यात आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 2ने समांतर तपास सुरू केला. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले यांना आरोपीतांबाबत काही गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने अनुषंगाने ढोले , सहायक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड आणि त्यांच्या पोलीस पथकाने कळंबोली ब्रिज खाली सापळा लावला. त्यादरम्यान राजू राजेश्वर सोनी उर्फ भैया , वय २८ वर्षे , राहणार कळंबोली व अशोक लक्ष्मण गाडेकर , वय ३० वर्षे , राहणार खांदा कॉलनी , नवीन पनवेल यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता दोघांनीही संबंधित गुन्हा केल्याचे कबूल केले . तसेच गुन्हा करताना वापरलेली वॅगनर मोटार कार क्रमांक एमएच – ४६ – बीबी -८७२२ , किंमत अंदाजे २,५०,००० ही कळंबोली परिसरातून ताब्यात घेण्यात आली . अटक आरोपींना पुढील तपासकामी कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले. संबंधित आरोपी हे सराईत असून राजू राजेश्वर सोनी उर्फ भैया याचेवर यापुर्वी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे ३ , कळंबोली पोलीस ठाणे येथे ३ , तुर्भे पोलीस ठाण्यात १ असे एकूण ७ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत . तर अशोक लक्ष्मण गाडेकर या आरोपीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात १ जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे . कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये कळंबोली सारख्या गजबललेल्या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपींना अत्यंत शिताफीने अटक केली. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने , सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले , सहायक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड , पोलीस हवालदार सचिन पवार , रणजित पाटील , पद्मसिंग पवार , पोलीस नाईक प्रफुल्ल मोरे , सम्राट डाकी , सुनिल कुदळे आणि पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी केले . या गुन्हयाचा पुढील तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या मार्फत करण्यात येत आहे.