नेहमीच्या वाहतुकीमुळे कळंबोलीकर त्रस्त
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः कळंबोलीचा विकास चारही बाजूने होत असताना मोठ्या प्रमाणात येथे रहिवाशी राहण्यास आले आहेत. त्यातच अनेकांकडे दुचाकी तसेच चारचाकी वाहने असल्याने कळंबोली वसाहती ही बाजारपेठेसाठी महत्वाची वसाहत बनल्याने येथे वाहने मोठ्या प्रमाणत येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून याबाबत वाहतूक शाखेेने लक्ष घालून वाहतूक सुरळीत करावी. तसेच वाहन चालकांना शिस्त लावावी, अशी मागणी कळंबोली वसाहतीमधून करण्यात येत आहे.
कळंबोली रोडपाली विभागात मोठमोठ्या इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. स्थानिकांसह बाहेरील राज्यातील रहिवाशी नोकरी व धंद्यानिमित्त येथे राहण्यासाठी आले आहेत. आज प्रत्येक घरात दुचाकीसह चारचाकी वाहन आहे. कळंबोलीमध्ये डी-मार्टसह मोठमोठी शॉपिंग कॉम्प्लेक्स व इतर खरेदीची दुकाने उपलब्ध असल्याने परिसरात असलेले अनेक गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी आता कळंबोलीमध्ये येत आहेत. परंतु सिडकोने नियोजन करताना अनेक ठिकाणी पार्कींगची व्यवस्था न केल्याने येणारे रहिवाशी बाजारपेठेत आल्यावर आपली वाहने कोणतेही नियमाचे पालन न करता उभी करून ठेवतात. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. सायंकाळच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात कळंबोली वसाहतीमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. काही ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्याने वाहने संथ गतीने जात असतात. त्यामुळे सुद्धा वाहनांची रांग लागते. तरी नियमांचे पालन न करणार्या व कशाही तर्हेने वाहने रस्त्यात उभी करणार्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी कळंबोली वसाहतीमधील नागरिकांनी केली आहे.